छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका समाजापुरते, भाषेपुरते त्सिमीत नसून संपूर्ण देशाचे राष्ट्रपुरुष आहेत. स्वराज्य घडविताना अनेक समाजातील मावळ्यांना घेऊन शिवरायांनी आपली सेना तयार केली होती. परंतु बेळगावमध्ये सुरु असलेले राजकारण हे निंदनीय असून छत्रपतींचा अवमान आपण सहन करणार नाही.
वेळ आल्यास आम्ही मदारी मेहतर प्रमाणे छत्रपतींच्या विरोधात अवमानकारक घटना रोखण्यास सज्ज राहू असे मत आज शहापूर येथील मुस्लिम युवकांनी व्यक्त केले आहे.
मणगुत्ती, पिरनवाडी येथील पुतळा वादावरून गेले १५-२० दिवस जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण आहे. कर्नाटकासहित महाराष्ट्रातूनही या घटनांचा निषेध व्यक्त होत असून तीव्र पडसादही उमटत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, निवेदनाचा खच पडत आहे. बेळगावमध्ये काही मूठभर मराठीद्वेष्ट्या व्यक्तींनी समाजात तेढ निर्माण करण्याकरिता केलेल्या कृत्याचा सर्वत्र निषेध होत आहे. या धर्तीवर आज शहापूर येथील मुस्लिम तरुणांनीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानकारक पोस्ट टाकणाऱयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी अहमद रेशमी,शकील मुल्ला आदी उपस्थित होते.