सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आमदार अनिल बेनके यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. कोविड च्या संकटाखाली पार पडणाऱ्या या उत्सवासंदर्भात तसेच कोविड रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयींसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. याचप्रमाणे शहर आणि परिसरात सर्वत्र रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि याबाबतीत उपाययोजना करण्यासंदर्भातही चर्चा झाली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ६ महिन्यांआधीच श्रीमूर्तींसाठी ऑर्डर दिलेल्या होत्या, परंतु प्रशासन गणेशोत्सवासाठी मार्गसूची जाहीर केली त्यावर उंच श्रीमूर्तींवर निर्बंध घातले आहेत. याबाबतीतील ही अट शिथिल करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शहर आणि परिसरात कोविड रुंगांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना बेडची व्यवस्था अपुरी पडत आहे, यावर योग्य ती कार्यवाही करावी, आणि रुग्णांना योग्य वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
शहर परिसरात वाहतूक वाढली असून, स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात येणारी रस्त्यांची कामे रखडली आहेत, अनेक रस्ते खड्ड्यानी भरून गेले आहेत, यामुळे प्रत्येकाला अडचणीला सामोरे जावे लागत असून अपघातांची संख्याही वाढली आहे, यासाठी त्वरित रस्ते डागडुजीचे काम हाती घेऊन, खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणीही त्यानी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.