मण्णिकेरी येथे जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बेळगाव तालुक्यातील मण्णिकेरी येथील रहिवासी व नाशिक आर्मी सेंटरचे जवान फकीरा शट्टू गुडाजी (वय 38) यांच्यावर रविवारी सकाळी गावातील स्मशानभूमित शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे अमर रहे फकीरा अमर रहे च्या घोषणा करून आसमान दुमदुमत होता. या घोषणेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ नातेवाईक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जवान फकिरा यांचे नाशिक येथे गुरुवारी सेवेत असताना हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी मन्नीकेरी येथे सकाळी अंत्यसंस्कार झाले. महिन्याभरापूर्वी ते आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानिमित्ताने गावी आले होते. आठ दिवसापूर्वी ते गावाहून नाशिक येथे रुजू झाले होते. मात्र काही दिवसातच त्यांचे निधन झाले.
त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी मन्नीकेरी येथे आणण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, अगसगे येथील मलगोंडा पाटील, बीजेपीचे नेते मारुती अष्टगी, तालुका पंचायत उपाध्यक्ष मारुती सनदी, काकतीचे सीपीआय राघवेंद्र हळळुर, ग्रामपंचायत अध्यक्षा गौरवा गुडघेनहटी, उपतहशिलदार ए. बी. बुवा, तलाठी ए. बी. सौदत्ती, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष राजू पाटील, बेकिनकेरेचे एसडीएमसी अध्यक्ष मल्लाप्पा गावडे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.
जवान फकीरा यांचे भाऊ व माजी ग्रामपंचायत सदस्य बाळाप्पा यांच्या हस्ते पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यावेळी फकीरा यांच्या पत्नी संगीता, आई गौरव्वा, मुलगा मंथन, मुलगी प्रिया यांनी अखेरचे दर्शन घेतले.
काकती पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यानी बंदुकीने हवेत फैरी झाडून फकीरा यांना सलामी दिली. गावातील सर्व गल्ल्यातून रांगोळ्या घालून ग्रामस्थांनी ट्रॅक्टर मधून अंत्ययात्रा काढण्यात आली. स्पीकरवरून ‘अमर रहे, अमर रहे, फकीरा अमर रहे ! यासह अन्य देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. गावातील सिद्धारूढ भजनी मंडळ अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. तसेच गावातील शिक्षक विद्यार्थ्यांनीही अंत्ययात्रेत सहभागी होऊन घोषणा दिल्या.