गेल्या १५ दिवसांपासून लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे विजेचा लपंडाव सुरु असून सतत ये-जा करणाऱ्या विजेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता बऱ्याच वेळासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
मागील १५ दिवसांपासून पावसामुळे खांब कोसळण्याच्या घटनाही येथे घडल्या होत्या. मात्र त्यानंतर हे खांब पूर्वस्थिती उभारण्यात आले आहेत. परंतु तरीही अनियमित काळासाठी सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही तासांच्या अंतरावर सुरु होणार असून याच्या तयारीसाठी प्रत्येक घरात लगबग सुरु आहे. मात्र सततच्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याशिवाय विजेच्या उपकरणातदेखील बिघाड होण्याच्या घटना घडत आहेत.
हेस्कॉमच्या वतीने याकडे लक्ष पुरवून खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु करावा, आणि गरज भासल्यास वेळापत्रक जाहीर करून योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.