मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र नुकसानीचे सत्र सुरु झाले. अनेकांना याचा फटका बसला. अनेकांची घरे उध्वस्त झाली तर अनेकांचे आयुष्यच पणाला लागले. गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथील कुंभार समाजावरही या संकटाने हात फिरवला आणि अनेक मूर्तींचे कामकाज करणारे हात रिकामे झाले.
एवढेच नव्हे तर करोडो रुपयांचे नुकसान झेलावे लागले. या धक्क्यातून अजूनही हे लोक सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. यंदा धास्तीमुळे येथील कामगारांची काम करण्याची मनःस्थिती नसल्यामुळे आणि पुन्हा जोखीम उचलण्याचे धाडस होत नसल्यामुळे यंदा सर्व कारागिरांनी आपल्या कार्यशाळा सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्रारंभ केला आहे.
कर्नाटकातील कोण्णूर हे गणपती मूर्ती बनविण्यासाठी एकमेव प्रसिद्ध ठिकाण आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा आणि आंध्रप्रदेश या राज्यात देखील येथील मूर्तीना खूप मोठी मागणी असते. येथील काड सिद्धेश्वर वीट आणि कुंभार कल्याण उत्पादक सहकारी संघाच्यानावाखाली हे सर्व कामकाज चालते. परंतु मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व काही वाहून गेले होते. इकोफ्रेंडली मूर्ती तयार करण्याच्या सामुग्रीचे खूप नुकसान झाले होते. यामुळे जवळपास ३०० हुन अधिक कुंभार समाजातील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली.
“बेळगाव Live” ला माहिती देताना काडसिद्धेश्वर संघाचे सुपरवायझर चन्नबसप्पा तिरकन्नवर म्हणाले कि, कुंभार समाजाशी निगडित ३०० हुन अधिक कुटुंब हि याच कामकाजावर अवलंबून असतात. गणेश मूर्ती बनविणे हेच येथील महत्वाचे कामकाज असून या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो. वातावरणपूरक म्हणजेच इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याचे कामकाज येथे चालते. मागील वर्षी सुमारे अडीज लाख मूर्ती बनविण्यात आल्या होत्या. परंतु अतिवृष्टीमुळे पुराचा सामना या भागाला करावा लागला. आणि या सर्व मूर्तींचे नुकसान झाले. जवळपास ११ फुटांइतके पाणी या भागात साचल्यामुळे मूर्तींसह इतर सामुग्रीचेही नुकसान झाले. यंदाही पूरसदृश्य स्थिती जाणवत असल्यामुळे मूर्ती बनविण्याचे काम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित सामुग्री सुरक्षित स्थळी हलविण्याचे ठरविले आहे.
जवळपास १७००० लोकसंख्या असलेल्या कोण्णूर गावात ९० टक्के लोक हे कुंभार समाजाशी निगडित आहेत. मागील वर्षी पुराचा फटका बसलेल्या कुटुंबाना सरकारने केवळ ८,२०० रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. नुकसानीच्या तुलनेत हि भरपाईची रक्कम खूप कमी आहे. यंदा कोणत्याही नुकसानीला सामोरे जाण्याची आम्ही जोखीम उचलणार नसल्याचे तिरकन्नवर यांनी सांगितले.
काडसिद्धेश्वर संघातर्फे गेली ३ वर्षे इकोफ्रेंडली गणेश मूर्तीच बनविण्यात येतात. १ ते ३ फुटांपर्यंतच्या मूर्ती येथे साकारल्या जातात. १९६२ साली स्थापन झालेल्या या संघामार्फत अनेक कुटुंबे उदरनिर्वाह करतात. परंतु मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा धसका या समाजाने घेतला असून यंदा मात्र येथील सर्व कामकाज ठप्प झाले आहे.