कोरोनाच्या संकटाकडे अद्यापही राज्यशासन म्हणावे तितक्या गांभीर्याने पहात नाही,याची प्रचिती येऊ लागली आहे. आता राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे मंत्री बी. श्रीरामलू स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
स्वतः आरोग्य खात्याचे मंत्री श्रीरामलू यांनी ट्विटरद्वारे स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले आहे. मला कोरोनाची लागण झालेली असली तरी मी आवश्यक खबरदारी घेऊन उपचार घेत आहे. राज्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य खात्यासह सर्व खात्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी कंबर कसली आहे. तेंव्हा जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला प्रारंभ झाला तेंव्हापासून मी राज्यातील 30 जिल्ह्यांचा पाहणी दौरा केला आहे. प्रत्येक ठिकाणी राज्य शासनाकडून कोरोनाला आळा घालण्यासाठी आपल्यापरीने सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. माझी देवाकडे प्रार्थना आहे की, मी लवकरात लवकर बरा होऊन समाजसेवेसाठी पूर्ववत सिद्ध होऊ शकेन.
गेल्या कांही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारी घ्यावी.
दरम्यान धक्कादायक बाब ही आहे की, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह राज्यातील वन खात्याचे मंत्री आनंद सिंग, पर्यटन खात्याचे मंत्री सी. टी. रवी, कृषी खात्याचे मंत्री बी. सी. पाटील, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आदी लोकप्रतिनिधी सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. राज्याच्या सरकारवरच कोरोनाची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेने स्वतः स्वतःची काळजी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
लोकप्रतिनिधी असोत मुख्यमंत्री असोत सर्वजण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांना सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये रुग्णांची होत असलेली हेळसांड लक्षातच येणार नाही. तेंव्हा सर्वसामान्य नागरिकांनी आता कोणावरही विसंबून न राहता शक्यतो घरात राहणे कोरोनासाठी असलेल्या सुरक्षिततेच्या उपायांची पालन करणे हेच उचित ठरणार आहे.