कालच बेळगावच्या पोलीस दलाने सर्व गणेशोत्सव महामंडळांची एकत्रित बैठक घेतली. सरकारने घालून दिलेले नियम, गणेशोत्सव मंडळांनी पाळाव्याच्या अटी आणि निर्बंध यांची चर्चा झाली. पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेतून एक मुद्दा सांगण्यात आला तो म्हणजे नागरिकांचे जीव सुरक्षित राहतील यावर भर द्या.
कोरोनाच्या संकटात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येकालाच हे भान बाळगावे लागेल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. हे भान समाजात बऱ्यापैकी आले आहे. कारण प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी आहे. माणूस म्हणून जगताना रूढी, रीती, परंपरा पाळायलाच लागतात. कितीही मोठे संकट समोर असले तरी प्रथा आपण पाळतोच. पण ती पाळताना आपल्या हातून काही चुकीचे घडू नये याची काळजीही घेतच आलोय. पोलीस यंत्रणा जरी इतर वेळी वादात असली तरी यावेळी ती जे काही सांगत आहे ते आपल्या आणि समाजाच्या भल्यासाठी याची जाणीव समाजात आहे. यातूनच गणेशोत्सव अधिक काटेकोर आणि काळजीपूर्वक होईल यात शंका नाही.
राहिला मुद्दा गणेश मूर्तीच्या उंचीचा, या मुद्द्यावर मंडळे जागृत झाली आहेत. मूर्तिकारांना यापूर्वी दिलेल्या जादा उंचीच्या मूर्तीचे पैसे देण्यास मंडळे तयार होत आहेत. ऐनवेळी लहान मूर्ती देणे ज्यांना ज्यांना शक्य झाले त्या मूर्तिकारांनी सोय केली. यावर्षीची मूर्ती पुढील वर्षी घेऊ या मुद्द्यावर हा करार होत आहे.
काही मूर्तिकार मात्र अडुन बसले आहेत असे समजत आहे. तुम्ही ऑर्डर दिलेलीच मूर्ती घ्या, ऐनवेळी नवीन मूर्ती कुठून देऊ, वर्षभर तुमची तयार मूर्ती ठेवणार कुठे असे प्रश्न विचारले जात आहेत. एकीकडे मंडळे पैसे आणि पुढील वर्षभराची हमी देत असताना काही मूर्तिकारांनी घेतलेली ही भूमिका वादात अडकत आहे.
गणेशोत्सवावर आलेले कोरोनाचे संकट अनेक व्यवसायांना त्रासदायक ठरत आहे. बाप्पा यावर्षीची भरपाई पुढील वर्षी करून देईल या आशेवर त्यांची वाटचाल सुरू आहे. अशीच श्रध्दायुक्त भावना आता मूर्तीकारांनीही जोपासायला हवी.
एकूणच गणेशोत्सव काळात कमी संख्येत आणि कमी गर्दीत आरती करावी लागेल. आगमन आणि निरोपाची धामधूम दिसणार नाही. बाप्पा येईल आणि आपल्या कासावीस भक्तांची कोरोनाच्या संकटातून सुटका करेल हीच प्रामाणिक अपेक्षा आहे.