बेळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अशुद्ध अवघड आहे. बोलून काय फायदा नाही, सांगून काय फरक पडत नाही आणि बोंबललं तरी ऐकू येत नाही अशी परिस्थिती आहे. माणूस एकदा दोनदा सांगून बघतो, ओरडतो, आंदोलन करतो, निवेदन देतो पण कायच फरक पडला नाही की निमूटपणे आहे ती परिस्थिती मानायला लागतो हे प्रशासन, अधिकारी आणि कंत्राटदारांना लक्षात आलं आहे. त्यामुळे रोजचे खडबडीत आणी खड्ड्यांनी भरलेले रस्ते आहेतच.बाप्पांच्या आगमनालाही असेच रस्ते असणार आहेत.
गणपती आला की दरवर्षी किमान खड्डे बुजवले जायचे. एंदा कोरोनाच्या नावाखाली ते पण मुजले नाहीत. कुठे जाईल तिथे खड्ड्यांची चाळण बघायला मिळते, याने बेळगाव खरोखर स्मार्ट झाले काय? हा प्रश्न सामान्य नागरिकाला पडतो. खरं तर हा प्रश्न सर्व अधिकाऱ्यांना पडायला पाहिजे. आलेल्या निधीतून आपण किती खर्च करतो याचे गणित त्यांना माहीत असते त्यामुळे या अशा रस्त्यांवर पलटणारी प्रत्येक गाडी, मोडणारे प्रत्येक हाड, जाणारा प्रत्येक जीव यांचा हिशोब त्यांच्याकडूनच घ्यायला पाहिजे.
आपले बेळगाव, सुंदर बेळगाव असे एक ब्रीद वाक्य पूर्वी महानगरपालिका मिरवायची. नैसर्गिक सौन्दर्य सोडले तर बाकी काही सुंदर नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि हे ब्रीद गेले. स्वच्छता आणि टाप टीप च्या बाबतीत तर आम्ही देशात 200 क्रमांकाच्या पुढेच असतो. कधी आपला पहिला क्रमांक लागावा अशी इच्छा कुणाला झाली नाही.
इतके महत्वाचे शहर, चांगली बाजारपेठ आणि तसाच कोट्यवधींचा कर वसूल करणाऱ्या प्रशासनाला साधे चांगले रस्ते देता येत नाहीत. प्रत्येक उन्हाळ्यात डांबर फिरवायचे आणि पावसाळ्यात धूऊन जायचे ही परिस्थिती कधी बदलली नाही. मग शहर काय सुधारणार?
एकीकडे दुसरी राजधानी म्हणायचं आणि रस्त्यावरून एक माणूस सरळ चालू शकत नाही, रिक्षा पालटतात. एक वाहन गेले की अंगावर चिखल आणि पाणी उडते आणि आम्ही सांगत फिरतो स्मार्ट सिटीत राहतो. गणपती बाप्पा नेच आता या बेजबाबदार अधिकाऱ्यांना शहाणे करावे ही इच्छा.