कोरोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर भीतीचे सावट आले. या संकटाच्या सावटातच यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचीनुसार सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हा उत्सव साजरा करणार आहेत.
हुतात्मा चौक येथील गणेशोत्सव मंडळापाठोपाठ आता गणाचारी गल्लीनेही एक प्रशंसनीय निर्णय घेतला आहे.
बेळगावचा चिंतामणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंडळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना यंदा करण्यात येणार नाही. याव्यतिरिक्त ११ दिवस आरोग्योत्सव करण्याचा ध्यास या मंडळाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेची वाताहत होत आहे. या कारणास्तव सर्वसामान्यांना अनेक आजारांवर उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे.
उत्सव काळात सलग ११ दिवस फ्लू क्लिनिक आणि विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जनतेच्या आरोग्याबाबत विचार करणे हे आपले आद्य कर्तव्य समजून या मंडळाने यंदा हा स्तुत्य उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
सार्वजनिक उत्सवाला मूर्त स्वरूप देण्याचे कार्य या गणेशोत्सव मंडळाच्यावतीने राबविण्यात येणार असून यापुढील काळातही सार्वजनिक उत्सवाचे मूळ स्वरूप असेच अबाधित राहील, अशी आशा आहे.
बेळगावात या गणेश मंडळाने श्री मूर्ती न प्रस्थापित करता मंडपात कोरोना काळात फ्लू क्लिनिक चालू करण्याचा निर्णय घेत लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या या सणाची खरी विधायकता जपण्याचा प्रयत्न केला आहे.