बेळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरस्थितीचा सामना करावा लागलेल्या ९० वर्षीय वृद्ध महिलेने मंदिराच्या कट्ट्यावर आसरा घ्यावा लागला होता. गेलं वर्षभर या मंदिराच्या कट्ट्यावर आसरा घेणाऱ्या या आजीबाईंना यंदाच्या पावसाने येथेही जगू दिले नाही.
यंदाच्या अतिवृष्टीमुळे या आजीबाईंना निराश्रित केंद्रात हलविण्यात आले. परंतु उपचारा अभावी आपल्या ७० वर्षीय मुलीच्या मांडीवर या आजीबाईंनी आपला प्राण सोडला. हि हृदयद्रावक घटना रामदुर्ग तालुक्यातील सुरेबान निराधार केंद्रात घडली आहे.
रामदुर्ग तालुक्यातील हिरेंहंपीहोळी गावातील या आजीबाईंच्या घराला गेल्यावर्षीच्या पावसाचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे सर्वस्व गमावलेल्या या आजीबाईंनी तब्बल वर्षभर मंदिराच्या कट्ट्यावर राहून आपले दिवस मोजले. अनेकठिकाणी याबाबत वृत्त प्रसारित झाले. परंतु प्रशासनाने याबाबतीत दुर्लक्ष केले आणि कोणतीही सुविधा देण्याचे सौजन्य दाखविले नाही.
कालांतराने या आजीबाईंना निराधार केंद्रात हलविण्यात आले. आजारपणामुळे आणि उपचार न मिळाल्यामुळे या निराधार केंद्रातच या आजीबाईंनी अखेरचा श्वास घेतला. या दरम्यान निराधार केंद्रात या आजीबाईंनी ७० वर्षीय मुलगी पोहोचली आणि या मुलीच्या मांडीवरच आजीबाईंनी आपले प्राण सोडले.
या आजीबाईंची प्राणज्योत मावळली आणि संपूर्ण निराधार केंद्रावर दुःखाची छाया पसरली. आजीबाईंच्या मुलीच्या आक्रोशाने संपूर्ण निराधार केंद्रातील इतर निराधारांचे डोळे पाणावले होते. या आजींच्या निधनाची वार्ता समजताच निराधार केंद्राला रामदुर्गच्या तहसीलदारांनी भेट दिली.