भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात गप्पांचे रंगणारे फड, अनेक शरीराचे कस पाहणारे मैदानी खेळ यामुळे इथली माणसे सुखात आणि दुःखात एकमेकात मिसळून जातात. ही भारत भूमीतील परंपरा आणि संस्कृती आहे.
आपल्या घरात केलेला पदार्थ शेजारच्या ताटात पडलाच पाहिजे ही जगण्यातली समृद्धी आहे . दुसऱ्याचे अश्रू पुसणे ही आमच्या हृदयाची धडधड आहे. हे जगण ज्या दिवशी आम्ही हरवतो त्यावेळी या भारतातलया पवित्र भूमीतील आमचं जगण खोटं आणि हिणकस वाटायला लागतं.
बेळगावात कोरोनाने माणुसकीचा झराच आठवला आहे. कुणाच्या तरी खोट्या पोस्ट पसरवणे, शेजारच्या घरात एखादा माणूस तपासणी साठी जरी गेला तर त्या बाजूच्या खिडक्या बंद करणं , त्या घराकडे कुश्चित नजरेनं पाहणं, त्याचा आपला काही संबंध नाही असं आपल्या स्वतःच्या मनाला पटवणं,आणि स्वतःच्या गळ्यात अमरत्वाचा पटटा घातल्या सारखं त्या घराकडे हिनकस नजरेनं बघणं, जीभ जळेल इतका अपप्रचार करणे हे बेळगावच्या माणुसकी जपणाऱ्या भव्य परंपरेला काळिमा फासणारं ठरत आहे.
बेळगाव शहरातील उत्तर भागातील उपनगरातील एका गल्लीतील तीन घरात पॉजिटीव्ह रुग्ण आल्याची वार्ता उपनगरात काय पसरली लोकांनी माणुसकीचा धर्मच बदलला. त्या तीन घरांशी नातंच तोडून टाकलं. भाजीपाला, किराणा सामान, दूध या सारख्या गरजेच्या वस्तू द्यायलासुद्धा लोकांनी पाठ फिरवली आधीच रोगाने खचलेले कुटुंब लोकांच्या अश्या वागणुकीने मनाने पार कोलमडून गेले.
बेळगावचा हजारो वर्षांचा इतिहास बघितला तर या गावांवर परकीय संकटे आली, मोगली सत्ता, आदिलशाही,निजामशाही, इंग्रज यांची आक्रमणे झाली, नैसर्गिक संकट आली, दुष्काळ महापूर महामारी दंगली येऊन गेल्या तरीही कधीही संकटाच्या काळात बेळगावने आपले बंधुत्व विसरले नव्हते. आपल्या ताटातल्या भाताच्या मुटक्यातला अर्धा मुठका दुसऱ्याला द्यायची बेळगावची परंपरा आहे.बेळगावात रात्री कोणताही माणूस उपाशी झोपत नाही ही बेळगावची खासियत आहे. बेळगाव हे गल्ल्यांचं आणि घराचं गाव आहे, त्या घराचं घरपण बेळगावकरानी प्राण पणाने जपले आहे. अश्या बेळगावात आलेल्या कोरोनाच्या आस्मानी संकटाने माणूसकी हरवत चालली हे बेळगावच्या चेहऱ्याला परवडणारे नाही.
बेळगावात माणूस स्वतःला सुरक्षित समजतो, या लौकिकाला बेळगावातील जनतेने बट्टा लावू नये .
शहरातील डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवून आजूबाजूच्या खेड्यातील लोक पहाटे पासून शहरात येऊन उपचार करून घेऊन जातात.शहरातील प्रत्येक डॉक्टरांची प्रॅक्टिस जोरातच चालली आहे. परंतु कोरोनाच्या संकट आले त्यावेळी याच डॉक्टरांनी आपले दवाखाने रुग्णांसाठी बंद केले हा प्रकार अवसानघातकी आहे.ज्या जनतेने या डॉक्टरांना साथ दिली त्याच रुग्णांना वाऱ्यावर सोडून बेळगावचे डॉक्टर आपली कातडी वाचवत आहेत.काही डॉक्टरांनी मात्र आपले दवाखाने उघडे ठेऊन सामान्य रुग्णां बरोबर कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याचे ठरवलेआहे. त्याला काही नागरिकांतुन विरोध होत आहे हे मात्र चुकीचं आहे.कोरोना बाधित रुग्ण आपले भाऊ बंद आहेत हे विसरून चालणार नाही.
खाजगी दवाखाने चालू तर झालेच पाहिजेत त्याचबरोबर तिथं कोविड वर सुरक्षितता बाळगून उपचारही झाले पाहिजेत.
जनतेने शेजारधर्म पाळावा …अन बेळगावची माणुसकी जपणारी परंपरा अबाधित ठेवावी. तरच आपल्याला बेळगावचा इतिहास सांगण्याचा अधिकार राहील.