माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर आठवण झाली ती दोन वेळा झालेल्या प्रणव मुखर्जी यांच्या भेटीची.अशा व्यक्तींची भेट होणे सहज शक्य नसते.भेटीचा योग असेल तरच अशा दिग्गजांच्या भेटीचे भाग्य लाभते.एक सभ्य राजकारणी,संसदपटू असे अनेक पैलू प्रणव मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्वाचे होते.उच्च पदावर असूनही व्यक्ती किती साधी असू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रणवदा म्हणावे लागेल.
त्यांची पहिली भेट झाली ती बेळगावच्या किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमात.त्यावेळी ते केंद्रीय अर्थमंत्री होते.आश्रमाचे स्वामी तदयुक्तानंद यांच्याशी नेहमी संपर्क असल्यामुळे त्यांनी माझ्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या.प्रणव मुखर्जीना एक प्रेझेंटेशन द्यायचे होते.त्यासाठी एक अलबम तयार करायचे काम स्वामीजींनी माझ्याकडे दिले होते.सुभाष फोटो स्टुडिओतून ते अलबमचे काम करून घेतले होते.प्रणव मुखर्जी यांचे दुपारी बाराच्या सुमारास किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमात आगमन झाले.गेटवर स्वामीजींनी उपस्थित मान्यवरांचा प्रणव मुखर्जीना परिचय करून दिला.नंतर त्यांना स्वामी विवेकानंदांनी वास्तव्य केलेल्या वास्तूत (आता ती वास्तू स्मारक म्हणून ओळखली जाते.) नेण्यात आले.
या वास्तूत स्वामी विवेकानंदांचे वास्तव्य होते असे त्यांना सांगण्यात आले.त्यांच्या वास्तव्याची सगळी तपशीलवार माहिती प्रणवदानी घेतली.नंतर त्यांनी तेथील विवेकानंदांच्या पुतळ्याला साष्टांग नमस्कार केला.तेथून त्यांना मंदिराकडे नेण्यात आले.तेथील माहिती स्वामीजींनी देताना स्वामी विवेकानंदांचा दाढी असलेला फोटो खूप दुर्मिळ असल्याचे सांगितले.ते ऐकून विथ बिअर्ड खूप रेअर असे उदगार प्रणव मुखर्जीनी काढले होते.
मंदिरात देखील त्यांनी डोके टेकून नमस्कार केला होता.दर्शन झाल्यावर आश्रमाचे सचिव स्वामी राघवेशानंदजी आणि स्वामी तदयुक्तानंद यांनी त्यांना अलबम दाखवून सगळी माहिती दिली.ते झाल्यावर त्यांना प्रसाद म्हणून खीर देण्यात आली.
माझे चित्रकार मित्र भरत जगताप यांनी प्रणव मुखर्जी यांचे कॅरिकेचर काढले होते.त्यावर सही घ्यायची होती.ते कॅरिकेचर मी स्वामी तदयुक्तानंद यांच्याकडे सही घेण्यासाठी दिले होते.प्रणव मुखर्जी जायला निघाले त्यावेळी मी स्वामीजींना सही घेतला काय म्हणून विचारले.
गडबडीत ते विसरले होते.कॅरिकेचर टेबलवर आहे म्हणून स्वामीजींनी सांगून मला आणायला लावले.ते कॅरिकेचर प्रणव मुखर्जी कारकडे जात असताना त्याना वाटेत थांबवून दाखवले.कॅरिकेचर पाहून ते हसले आणि त्यांनी मला विचारले मी असा दिसतो काय?मी उत्तरादाखल केवळ हसलो.ही प्रणवदांशी झालेली पहिली भेट.
दुसरी भेट देखील बेळगावच्या रामकृष्ण मिशन आश्रमाच्या कार्यक्रमामुळे झाली.बेळगावातील रिसालदार गल्लीतील उप केंद्राच्या आवारात म्युझियम आणि अन्य प्रकल्पाच्या भूमी पूजनासाठी प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना आले होते.कार्यक्रम स्थळी आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी वास्तव्य केलेल्या खोलीला भेट देऊन स्वामी विवेकानंदांनी वापरलेल्या कॉट, काठी आदींची माहिती घेऊन स्वामी विवेकानंद यांच्या फोटो समोर ते नतमस्तक झाले.या दोन कार्यक्रमाच्या निमित्ताने एक तर मला त्यांच्या साधेपणाने दर्शन घडले आणि दुसरे म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या प्रति असलेल्या श्रद्धेचे दर्शन घडले.प्रणवदा यांच्या दोन्ही भेटीचे क्षण सदैव स्मरणात राहणारे आहेत.
सौजन्य -विलास अध्यापक -एबीपी माझा बेळगाव