बेळगावच्या जिल्हा क्रीडांगणावर उद्या ७४व्या स्वातंत्र्यदिनाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी सकाळी ९.०० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. जिल्हा पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्याचे मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी आणि मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी, महिला आणि बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विणकर समाजाचे नेते आणि अल्पसंख्यांक विभाग मंत्री श्रीमंत पाटील, उपसभापती विश्वनाथ मामनी, विधान परिषदेचे मुख्य सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, मुख्यमंत्र्यांचे राजकीय कार्यदर्शी शंकरगौडा पाटील, तांडा विकास मंडळाचे अध्यक्ष पी. राजीव, झोपडपट्टी विकास मंडळाचे अध्यक्ष महेश कुमठळळी यांचाही या सोहळ्यात सहभाग असणार आहे.
या सोहळ्यात ध्वजारोहणानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कवायतींचे प्रदर्शन होणार असून सशस्त्र दलाचे पथसंचलन आणि त्यानंतर प्रमुख अतिथींची भाषणे होणार आहेत. याशिवाय स्वतंत्रसैनिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.