शनिवारीबेळगावचे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी नरगुंदकर भावे चौक येथील गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्रीगणेशाची पूजा आणि आरती केली.नरगुंदकर भावे चौकात व्यापारी बंधू, रिक्षा चालक, मालक यांच्यावतीने श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांच्या हस्ते आज येथे पूजा करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम जारकीहोळीनी स्वातंत्र्यवीर नरगुंदकर भावे यांच्या पुतळ्यालाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी जारकीहोळीचा सत्कार केला. तसेच माजी महापौर शिवाजी सुंठकर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
गेली ५५ वर्षे सतत हा उत्सव येथे साजरा करण्यात येतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गसूचीनुसार यंदा गणेशोत्सव साधेपणात साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून दोन फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना चौकातील श्री दत्त मंदिरात करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थितांना उद्देशून बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले कि, यंदाचा गणेशोत्सव साध्यारीतीने साजरा होत असून संपूर्ण जगावर आलेले हे कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी आपण गणेशाकडे प्रार्थना करू. यादरम्यान त्यांनी बेळगावचे माजी नगराध्यक्ष कै. शिवाजीराव काकतकर यांच्यासोबतच्या आठवणी ताज्या केल्या.
या कार्यक्रम दरम्यान प्रशांत कागल, मराठा बँकेचे संचालक शेखर हांडे, प्रेम राजपुरोहित, प्रभाकर बर्वे, संजय मनगुतकर , मधू भाटे, पुजारी, रजत सिद्दण्णावर, सौ. गोदव्वा, वसंत बोरांना, ब्रम्हे, परांजपे, श्रीकांत शेवडे, दामोदर पांगम, वैजनाथ सिद्दन्नवर तसेच इतर व्यापारी बंधू उपस्थित होते. आभार मंडळाचे सेक्रेटरी राजू हंडे यांनी मानले.