बेळगाव शहरातील निधन पावलेल्या व्यक्तींची संख्या कधी नव्हती इतकी वाढली आहे. कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यापासून शहरातील निधन पावणार्या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, यासंदर्भात “बेळगांव लाईव्ह” ने शहरातील स्मशानभुमीना भेट देऊन आढावा घेतला असता प्रत्येक ठिकाणी सर्वसाधारण संख्येपेक्षा अधिक प्रमाणात अंत्यसंस्कार केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टीम बेळगांव live ने प्रारंभी वडगांव स्मशानभूमीचा आढावा घेतला असता या स्मशानभूमीत गेल्या 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत 21 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तसे पाहता सर्वसामान्यपणे या स्मशानभूमीत 2 – 3 दिवसाआड एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र सध्या हे प्रमाण इतके वाढले आहे की, अवघ्या 13 दिवसांत या ठिकाणी 21 जणांना मोक्ष देण्यात आला आहे.
शहरातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मशानभुमी असणाऱ्या शहापूर मुक्तिधाम या स्मशानभूमीत देखील मृतांवर मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार केले जात आहेत. याठिकाणी गेल्या जुन महिन्यात ६१ ,जुलै महिन्यात तब्बल126 तर ऑगस्ट महिन्याच्या 1 ते 13 तारखेपर्यंत 81 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये 2 कोरोनाबाधीत रुग्णांचा ही समावेश आहे. या स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराची नोंद ठेवणाऱ्या सरकार नियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच शहापूर स्मशानभूमीत इतक्या मोठ्या प्रमाणात अंत्य संस्कार केले जात असल्याचे त्यांने सांगितले.
दरम्यान, शहराची प्रमुख स्मशानभूमी असणाऱ्या सदाशिवनगर स्मशानभूमीतील परिस्थिती कांही वेगळी नाही. या स्मशानभूमीत गेल्या जून महिन्यात 66 जणांवर आणि हा आकडा वाढत जाऊन जुलै महिन्यात एकूण 197 अंत्यसंस्कार करण्यात आले. कहर झाला तो ऑगस्ट महिन्यात या महिन्यात गेल्या 1 ते काल गुरुवार दि. 13 ऑगस्ट 2020 पर्यंत तब्बल 231 मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. हे अंतिम संस्कार स्थानिक आणि जिल्ह्यातील काही कोरोना बाधित रुग्ण देखील आहेत त्यामुळे देखील हा आकडा मोठा दिसत आहे. इतर स्मशान भूमी प्रमाणे शहरातील अंजुमन इस्लामच्या मुस्लिम कबरीस्तान मध्ये देखील पूर्वीपेक्षा मयतांचा आकडा वाढला आहे
गेल्या दोन-तीन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंदर्भातील सरकारी आकडेवारी रोजच्या रोज जाहीर केली जात असली तरी वैद्यकीय सेवेबाबत आरोप केले जात आहेत.
मयतांचा आकडा वाढत असला तरी कोरोना आहे बरा होणार आजार आहे त्यामुळे कोरोनाची भीती मनातून काढणे गरजेचे आहे या शिवाय जनतेने न घाबरता नियमाचे पालन करणे जरुरी बनले आहे. लोकांनी त्यासाठी स्वतः नियमन करून घेणे गरजेचे आहे. कोणत्याही संकटाला घाबरण्या पेक्षा त्या संकटाचा अभ्यास साकारून त्याच्यावर कशी मात करता येईल हे पाहिले पाहिजे. बरा होण्याचा टक्का मोठ्या प्रमाणात आहे केवळ २ टक्केच लोकांचे मृत्य होत आहेत त्यामुळे मनात कोरोनाची भीती न बाळगता आत्मिक बळावर यावर मात केली पाहिजे.