बेळगाव शहर गुन्हे तपास व वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी चंद्रशेखर निलगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलगार हे उद्या रविवारी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
राज्यातील केएसपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार बेळगांव शहर गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांची बदली झाली आहे. गेल्यावर्षी 4 मार्च रोजी तत्कालीन पोलीस उपायुक्त महालिंग नंदगावी यांच्या जागी वंटगोडी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
त्यावेळी यशोदा वंटगोडी यांनी रखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य देण्याबरोबरच वाहतूक विभागाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता कौटुंबिक कारणास्तव त्यांची बदली लोकायुक्त पोलीस प्रमुखपदी करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी सध्या खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणारे चंद्रशेखर निलगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव शहर गुन्हे तपास व वाहतूक विभाग उपायुक्त म्हणून उद्या रविवारी चंद्रशेखर निलगार आपल्या अधिकारपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.