कोविड-१९ चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात असुविधा निर्माण होत आहेत, हि अडचण दूर करण्यासाठी आणि यासंबंधित मागण्यांसाठी आज माजी नगरसेवकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कोविड च्या पार्श्वभूमीवर गेले अनेक महिने नागरिक हैराण झाले असून या महामारीला अनेक जण बळी पडले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येत नाहीत. कोविडसंदर्भात प्रत्येक नागरिक खबरदारी घेत आहेत.
परंतु तरीही अनेकांना या आजाराला सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांच्यावरील उपचारासाठी कर्नाटक सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना राबवण्यात येत नाहीत. यामुळे अनेकांना आपला जीव गमावण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
जिल्हा रुग्णालयासहित खाजगी रुग्णालयात या रुग्णांना उपचारासाठी फेऱ्या माराव्या लागत असून उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना दाखल करून घेण्यात येत नाही. त्याचप्रमाणे रुग्णालयांकडून जादा आकारणी करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना हा खर्च परवडणारा नाही. जिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर्सचीही कमतरता, बेड्सची कमतरता आणि इतर आवश्यक सुविधांचीही कमतरता आहे. कोरोनासारख्या रोगाची भीती बाळगून अनेक डॉक्टर्स आणि परिचारिका उपचार करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. कोरोना वॉरियर्सही आता एक पाऊल मागे आहेत. कोविड-१९ मुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांचे उत्पन्न मिळविण्याचे साधन बंद झाले आहे. अशातच रुग्णालयांची ही परिस्थिती त्याहूनही भयानक आहे.
यामुळे कोविड संदर्भात प्रशासनाने योग्य पाऊले उचलून सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात सेवा मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, आणि जिल्हा रुग्णालयासहित खाजगी रुग्णालयात यावरील उपचारासंदर्भात ठोस पाऊले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
हे निवेदन सादर करताना अँड. नागेश सातेरी, दीपक वाघेला, संजीव प्रभू, रेणू किल्लेकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.