महाराष्ट्रात आणि पश्चिम घाटात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक नद्या ओसंडून वाहत आहेत. यामुळे वेदगंगा नदीसह उर्वरित नद्यांमधील जवळपास १ लाख क्युसेक पाणी कल्लोळ पुलावरून वाहून येत आहे. कृष्णा – वेदगंगासह उर्वरित नद्यांमधून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे एकूण ७ पूल पाण्याखाली गेले आहेत.
महाराष्ट्रातून येणार हा पाण्याचा ओघ असाच सुरु राहिला तर बेळगाव जिल्ह्यात असणाऱ्या नद्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीमुळे आसपासच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृष्ण नदीतीरावर असलेली शेती जलमय झाली आहेत.
जिल्ह्यात उद्भवलेल्या या संभाव्य पुरस्थितीमुळे नदीतीरावर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथक तैनात करण्यात आली आहेत. शिवाय पुरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारीही घेणार आली आहे.
गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे मलप्रभा, घटप्रभा, हिरण्यकेशी आणि मार्कंडेय या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मलप्रभा नदीत चिंताजनक पाण्याची पातळी वाढली असून खानापूर भागातील जांबोटी परिसराचा संपर्क तुटला आहे.
येत्या २ दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून हवामान खात्याच्यावतीने राज्यातील ९ जिल्ह्यांना “यलो अलर्ट” जारी केला आहे. त्यामध्ये उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, शिमोगा, चिक्कमंगळूर, हासन, कोडगू, बेळगाव आणि धारवाड जिल्ह्याचा समावेश आहे.
पावसाचा ओघ जर असाच कायम राहिला तर कृष्णा नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात होत असलेल्या पावसामुळे तब्ब्ल २ लाख क्युसेक पाण्याचा ओघ कर्नाटकात येण्याचीही शक्यता आहे.