कोरोनामुळे गेले अनेक दिवस गणेशोत्सवाबाबत प्रशासनाच्यावतीने अनेक नियम-अटींसह मार्गसूची जाहीर करण्यात आली होती. गणेशोत्सव महामंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, कार्यकर्ते पोलीस विभाग आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ बसत नव्हता. वारंवार बैठक घेऊन गणेशोत्सव आचरणाबाबत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने ठरविण्यात आलेल्या मार्गसूचीत आज काही बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात आज पुन्हा पोलीस दल आणि तिन्ही महामंडळांची बैठक बोलाविण्यात आली होती.
या बैठकीला उपस्थित नेताजी जाधव यांनी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली. मंदिरे उपलब्ध नसलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना १० x १० आकाराचा मंडप उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयासाठी गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने प्रशासनाचे आभार मानण्यात आले. याव्यतिरिक्त ज्या गणेशोत्सव मंडळाच्यावतीने जवळच्या मंदिरात, हॉलमध्ये किंवा व्यायाम शाळेत श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे यासाठी केवळ पोलीस दलाला माहिती देणे आवश्यक आहे.
याशिवाय हेस्कॉम, अग्निशामक दल किंवा इतर कोणत्याही विभागाला याची माहिती देणे बंधनकारक नाही. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवेळी केवळ ५ जणांनाच परवानगी असून वाहनातून श्रीमूर्ती घेऊन जाणे बंधनकारक आहे. पायी चालत जाण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली आहे. अशी माहिती नेताजी जाधव यांनी दिली.
यावेळी अथणी गणेशोत्सव महामंडळाचे विजय जाधव म्हणाले कि, प्रशासनाच्यावतीने ठरवून दिलेली मार्गसूची हि सरकारच्या हितासाठी नसून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बनविण्यात आली आहे. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे हे प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचे कर्तव्य आहे. कोरोनासारखा आजार पुन्हा पसरू नये यासाठी सर्वानी खबरदारी घेऊन हा उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करायचा आहे. गेल्या ५ महिन्यात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी खूप त्रास सहन करावा लागला आहे. पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन प्रत्येकाने मार्गसूचीचे आचरण करावे, आणि कोणत्याही विघ्नाशिवाय हा उत्सव पार पाडावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील म्हणाले कि, मार्गसूचीतील नियम आणि अटी यात अतिरिक्त बदल करण्यात आला नसून काही अंशी बदल करण्यात आला आहे. यंदाचा गणेशोत्सव प्रत्येकाने खबरदारीच्या साजरा करायचा असून उत्सवासहित आरोग्य संभाळणेही महत्वाचे असल्याचे मत रणजित चव्हाण पाटील यांनी व्यक्त केले.