नंदिहळ्ळी (ता. बेळगांव) गावानजीकच्या शेतवडीतील श्री वाकडे वाट देवी देवस्थानाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याचा तात्पुरता पूल पाण्यात वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणी स्वतः पुजाऱ्यांनी श्रमदानाने साकव उभारल्यामुळे भाविकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे
नंदिहळ्ळी गांवाजवळ शेतवाडीमध्ये श्री वाकडे वाट देवीचे देवस्थान आहे. भाविक मोठ्या संख्येने या देवस्थानाला भेट देत असतात. तथापि आजतागायत या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचा विकास करण्यात आलेला नाही.
त्याचप्रमाणे या रस्त्यावर लागणाऱ्या नाल्याच्या ठिकाणी पक्क्या पुलाची (मोरी) गरज आहे. गेल्या अनेक वर्षापासून संबंधित नाला ओलांडण्यासाठी भाविकांनी तात्पुरता साकव वजा पूल बांधला होता. तथापि गेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर येऊन सदर पूल वाहून गेला होता. त्यामुळे या मार्गावरून ये -जा करणाऱ्या भाविक आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती.
ही गैरसोय लक्षात घेऊन श्री वाकडी वाट देवस्थानाचे पुजारी नागेश पुजारी यांनी गिऱ्याप्पा कुरबुर आणि सिद्राय कुरबुर यांच्या सहकार्याने श्रमदान करून काल बुधवारी नाल्यावर नवा साकव उभारला आहे.
यामुळे सदर मार्गावरून ये-जा करणाऱ्या भाविकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तथापि सदर साकव म्हणजे तात्पुरती सोय आहे हे लक्षात घेऊन या भागाच्या लोकप्रतिनिधींनी संबंधित नाल्यावर मजबूत कायमस्वरूपी पूल बांधून द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.