लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली होती. यादरम्यान मद्यविक्रीतून मिळणारे जवळपास ५० टक्के उत्पन्न कमी झाले असून महसूल विभागाचे सुमारे ३००० कोटींचे नुकसान झाले आहे. बार आणि रेस्टोरंटस सुरु झाल्यानंतर महसूल विभागाच्या उत्पादन शुल्कात वाढ होईल, परंतु गोव्याहून बेळगावला छुप्या मार्गाने अनधिकृतपणे मद्यसाठा आणला जात आहे, यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती महसूल मंत्री एच. नागेश यांनी दिली. शनिवारी सुवर्णविधानसौध येथे महसूल विभागाच्या प्रगती आढावा बैठकीत त्यांनी हि माहिती दिली.
गोव्याहून दिवसेंदिवस बेळगाव जिल्ह्यात अनधिकृत मद्यवाहतूक करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यासाठी बेळगाव – गोवा सीमेवर बारीक लक्ष ठेवण्याच्या अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. छुप्या मार्गाने मद्यवाहतूक करून मद्यविक्री करणाऱ्यांवर अधिकाधिक दंड आणि कठोर शिक्षा देण्यासाठी पाऊले उचलली जातील, यामुळे असे प्रकार घडणे कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले कि, बार आणि रेस्टॉरंट उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. बार आणि रेस्टॉरंट उघडल्यास सरकारला अधिक महसूल मिळू शकेल; परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर बार आणि रेस्टॉरंट्स उघडण्यास परवानगी नाही. तसेच नवीन एमआरपी स्टोअरसाठी परवानाही देण्यात येत नसून यासंदर्भात सरकारने मार्गसूची जाहीर केली आहे.
महसूल विभागाने १८००४२५२५५ हि हेल्पलाइनही सुरु केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पुढील वर्षी महसूल विभागातील सर्व कर्मचार्यांना पदोन्नती दिली जाईल. महसूल विभागातील कर्मचार्यांच्या संरक्षणासाठी पोलिस खात्याशी चर्चा करून शस्त्र देण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या बैठकीला राज्य महसूल विभागाचे आयुक्त डॉ. लोकेश, सहआयुक्त डॉ. वै. मंजुनाथ यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.