कोरोना महामारीच्या सावटाखाली यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. मार्च महिन्यांपासून अनेक बदलांना सामोरे जात नागरिकांनीमोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आता परिवर्तित उत्सव साजरा करण्यासाठी पाऊल सरसावले आहे. या संकटातून मार्ग काढत परंपरेनुसार यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बेळगाव सज्ज झाले आहे.
प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाची लगबग सुरु होताच बाजारपेठेत उत्सवाआधीच १५ दिवस नागरिकांची झुंबड उडते. परंतु कोरोनाच्या छायेखाली जगणाऱ्या नागरिकांनी यंदा मात्र बाजारपेठेकडे पाठ फिरवली. स्थानिक बाजारपेठेत सर्वकाही उपलब्ध होत असल्याने आणि पावसामुळे मूळ बाजारपेठेत यंदा नागरिकांची वर्दळ दिसून आली नाही. गेला आठवडाभर ठप्प असलेली बाजारपेठ गुरुवारपासून पुन्हा बहरली आहे.
बाप्पांच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गसूचीनुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणात पार पडणार आहे. परंतु तरीही घरगुती गणेशोत्सवासाठी उत्साही नागरिकांनी गणेशोत्सवाच्या सजावटीच्या सामानासाठी बाजारात गर्दी केली. संपूर्ण बाजारपेठ सजावटीचे साहित्य, हार, फुले, पूजेचे साहित्य, किराणा दुकाने, वस्त्रदालने, मिठाई आणि अशा अनेक साहित्याने भरून गेली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गेले ५-६ महिने थंड असलेली बाजारपेठ गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा बहरू लागली आहे.
कोरोनाचे पर्व सुरु झाल्यापासून प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. परंतु गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी मात्र इतकी गर्दी केली कि यामध्ये सामाजिक अंतराचे भान जपले गेले नाही. एव्हाना कोरोना हा सामान्य आजार असल्याचे नागरिकांनी ठरवले आहे. स्वतःची सुरक्षितता जपत आपला जीव आपल्या मुठीत घेऊन नागरिक बाजारपेठेत उतरले असल्याचेही चित्र यावेळेस पाहायला मिळाले.
सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत पुन्हा पुन्हा बैठक घेऊन बऱ्याच गणेशोत्सव मंडळांनी साधेपणात हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. प्रशासनाची मार्गसूची बहुतांशी मंडळांनी स्वागतार्ह ठरवली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर उभारण्यात येत असलेले मंडप मात्र यंदा उभे करण्यात आले नाहीत.
गेले पाच महिने दडपण, भीती आणि रोगाची धास्ती घेतलेल्या नागरिकांनी मात्र बाजारपेठेत जल्लोषात खरेदीला सुरुवात केली. इतके दिवस थंड असलेल्या लहान,मोठ्या व्यावसायिकांच्या व्यापार-उद्योगाला गती मिळाली. कोविड चे संकट लवकरात लवकर दूर सारून आर्थिक सुबत्तात येउदे आणि विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येउदे, हीच आता बाप्पाचरणी प्रार्थना!