बहुचर्चित दहावीच्या परीक्षा कोरोनाच्या सावटाखाली पार पडल्या. बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातून सुमारे ७४ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आणि सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या या परीक्षांच्या निकालाची तारीखही जाहीर झाली.
सोमवार दिनांक ९ ऑगष्ट रोजी जाहीर होणाऱ्या निकालासंदर्भात बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसहित पालकवर्गाचेही मनोधैर्य वाढविले आहे.
विद्यार्थी तसेच पालकवर्गाने संयम आणि धीराने निकालाला सामोरे गेले पाहिजे. ज्यापद्धतीने कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांनी धैर्याने परीक्षा दिली त्याचप्रमाणे निकालाबाबतीतही धैर्य आणि सकारात्मक विचार जोपासावेत, निकाल नक्कीच उत्तम येईल, परंतु कदाचित निकाल हा नकारात्मक आला तर त्यासाठी ताबडतोब सप्टेंबरमध्ये पुनर्परीक्षांचेही आयोजन करण्यात येईल.
विद्यार्थी व पालकांनी आत्मविश्वास बाळगला पाहिजे. विद्यार्थी, शिक्षण संस्था आणि पालकांनी भीती वाटून घेण्याचे कोणतेच कारण नसून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुधारण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन नक्कीच पाठीशी राहील, असे असे आश्वासन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले आहे.