1942 साली भारताच्या हवाई नकाशावर बेळगांवने आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आणि तेंव्हापासून अनेक विमान कंपन्यांनी या विमानतळाची निवड करून या प्रदेशाची सेवा केली. याखेरीज हवाईदलाच्या नेहमीच्या विमानासह खाजगी जेट विमानांची याठिकाणी ये-जा सुरू असते. तथापि जून 2020 मध्ये प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने बेळगांव -आयएक्सजी अर्थात बेळगाव विमानतळ हे बेंगलोरनंतरचे कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ ठरले आहे.
गेल्या जून महिन्यात बेळगांव विमानतळावर 391 विमानांचे आगमन व उड्डाणं झाले आणि 10,224 प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला आहे. लॉक डाऊननंतर विमानसेवा प्रारंभ झाल्यापासून विमानांच्या 855 ऑपरेशन्सद्वारे एकूण 25,300 प्रवासी बेळगाव विमान तळावरून आपापल्या इच्छित स्थळी पोहोचले आहेत.
अलीकडच्या भूतकाळात बेळगांव विमानतळ 5 विमानाद्वारे मुंबई, बेंगलोर, हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणी उत्तम सेवा देत होते. परंतु अचानक उडाण -2 योजनेची अंमलबजावणी झाली आणि बेळगांवच्या पाचही विमानसेवा हुबळीला वळवण्यात आल्या.
तथापि आता बेळगांव विमानतळाने विमानांची ज्यादा संख्या आणि ज्यादा हवाईमार्गांच्या स्वरूपात धडाकेबाज पुनरागमन केले आहे. सध्या बेंगलोर (3 उड्डाणे), मुंबईसाठी (2 उड्डाणे), हैदराबाद (3 उड्डाणे), म्हैसूर, पुणे, इंदोर व अहमदाबाद येथील विमान सेवेद्वारे बेळगाव विमानतळाचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे.
बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी अलीकडेच सीआयआय बेळगांवतर्फे आयोजित डिजिटल कॉन्फरन्समध्ये “न्यू ऐज कनेक्टिव्हिटी अँड लॉजिस्टिक्स” या विषयावर बोलताना बेळगाव विमानतळावर 4,000 चौ. मी. (43,000 चौ. फू.) डोमेस्टिक कार्गो टर्मिनल उभारण्याची योजना आणि मेसर्स घोडावत ग्रुपला बेळगांव विमानतळावर एक हँगर देण्यात आला असल्याचे सांगितले होते.
बेळगांव विमानतळाकडे पुरेशी जमीन उपलब्ध असल्यामुळे कार्गो आणि हँगर सारखे विकास प्रकल्प राबवता येणे शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.