राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने एसओपी संदर्भात जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचीनुसार महाराष्ट्रासह अन्य परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्या लोकांसाठी आता फक्त 14 दिवसांचे होम काॅरंटाईन अनिवार्य असणार आहे.
राज्य सरकारच्या गेल्या 30 जून 2020 च्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलेल्या अनलॉक -2 च्या मार्गदर्शक सूचीनुसार कंटेनमेंट झोन्स बाहेरील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्ववत सुरळीत करण्यात आले. तसेच कंटेनमेंट झोन्समधील लॉक डाऊनचा कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविण्यात आला.
अनलॉक -2 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार आंतरराज्य प्रवासी आणि मालवाहतुकीस परवानगी देण्यात आली. त्यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने 8 जून 2020 रोजी परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवा एसओपी जारी केला. तसेच दि. 15 आणि 20 जून रोजी काॅरंटाइनच्या नियमावलीत बदल करण्यात आले.
पुढे अनलॉक -2 च्या कालावधीतील काॅरंटाइन नियमांचा आढावा घेऊन आता यासंदर्भातील नवी मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून कर्नाटकात येणाऱ्यांसाठी आता फक्त 14 दिवसांचे होम काॅरंटाइन अनिवार्य करण्यात आले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जारी केलेली मार्गदर्शक सूची आणि एसओपी पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचे राज्याच्या कार्यकारी समितीचे सदस्य -सेक्रेटरी आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याचे कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांनी एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.