मागील चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र मंगळवार पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. याचा फटका नदीकाठच्या वसाहतीला बसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या साऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रातून 70 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. मात्र अजूनही एक लाख क्यूसेक्स पाणी सोडल्यानंतर नदीकाठ परिसरात असणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. मात्र प्रशासन गाफिल नाही. यासाठी सर्व ती तयारी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासून कामाला लागणे गरजेचे आहे.
सध्या पूर परिस्थिती निर्माण होत आहे. आणखीन दोन दिवसात पाऊस पडला तर परिस्थिती गंभीर होणार आहे. त्या दृष्टीकोनातून नदीकाठ परिसरात असणाऱ्यांना धोक्याचा इशारा द्यावा व स्थलांतरित करण्यासाठी शाळा खाजगी संस्थांना सांगावे असा आदेशही जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी दिला आहे.
बुधवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नदीनाल्यांना पाणी आले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता महापुराची दखल घेण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे असल्याचे मतही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.