मार्कंडेय नदीवरील पुलाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले असून जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी आज शुक्रवारी सकाळी या कामाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
जनहितार्थ कायम सक्रिय असणाऱ्या जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्या प्रयत्नामुळे उचगांव भागातील अनेक रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत आणि केली जात आहेत. तथापि मार्कंडे नदीवरील पुलाच्या रस्त्याचे काम अद्याप प्रलंबित होते. यासंदर्भात सरस्वती पाटील यांनी कार्यकारी अभियंता संजयकुमार हुलकावी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज शुक्रवारपासून या पुलावरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्याची पाहणी करून जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी कंत्राटदाराला आवश्यक त्या सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आर. आय. पाटील व इतर उपस्थित होते.
यापूर्वी मार्कंडेय नदीवरील सदर पूल कमकुवत झाल्याची शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे सरस्वती पाटील यांनी ही बाब जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी बेंगलोर होऊन यंत्रसामुग्री मागून या पुलाची क्षमता तपासण्यात आली होती. तसेच पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र पुलावरील रस्ता खराब झाला असल्यामुळे तेंव्हापासून या रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे यासाठी सरस्वती पाटील प्रयत्नशील होत्या. मार्कंडेय नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे यापूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे, फक्त पुलावरील रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे बाकी होते. आता या कामाला देखील सुरुवात झाल्यामुळे या पुलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.