एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी आज धारेवर धरून त्याची चांगलीच कानउघडणी केली.
बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटसाठी कंग्राळी खुर्दवासियांनी स्वतःची शेकडो एकर जमीन देऊ केली आहे. तथापि या कंग्राळी खुर्द गावासाठी प्रशासनाने अद्यापपर्यंत चांगला रस्ता बनवून दिलेला नाही. एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंत सुस्थितीतील रस्ता व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जि. पं. सदस्य सरस्वती पाटील सातत्याने आवाज उठवत आहेत.
अलीकडेच त्यांनी यासंदर्भात वेळ पडली तर आंदोलन करू असा इशाराही दिला होता. सध्या पावसाळ्याच्या कंग्राळी खुर्द गावाकडे रस्त्याची अत्यंत निकृष्ट डागडुजी करण्यात आली आहे. यासंदर्भात रस्त्याची पाहणी करून जि प सदस्य सरस्वती पाटील यांनी संबंधित कंत्राटदाराला धारेवर धरले.
लोकांचे बळी गेल्यानंतरच तुम्ही शहाणे होणार का? काम करायचे असेल तर मनापासून करा, मी माझ्यासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी तुम्हाला जाब विचारत आहे. गेली चार वर्ष आम्ही या रस्त्यासाठी झगडत आहोत किमान डागडुजीचे काम तरी व्यवस्थित करा, असे सरस्वती पाटील यांनी संबंधित कंत्राटदाराला सुनावले.
याप्रसंगी एपीएमसी पोलिस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी जावेद मुशापुरी, आर. आय. पाटील यांच्यासह कंग्राळी खुर्द येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. बेळगाव एपीएमसी भाजी मार्केट उभारणीमध्ये कंग्राळी खुर्दवासियांचा मोठा वाटा आहे.
तथापि अद्यापपर्यंत या गावासाठी प्रशासनाकडून चांगल्या रस्त्याची सोय करण्यात आलेली नाही. जि. पं. सदस्या सरस्वती पाटील या रस्त्यासंदर्भात सातत्याने आवाज उठवत असल्याबद्दल कंग्राळी ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.