कोरोनाचे संकट कोसळलेले असताना देखील कोणतीही खबरदारी न घेता बहुसंख्य पर्यटक येळ्ळूर गावानजीकच्या राजहंस गडावर अत्यंत हलगर्जीपणाने मुक्तसंचार करत असल्याचा धोकादायक प्रकार शनिवारी पहावयास मिळाला. या पर्यटकांपैकी काही मोजक्यांनीच मास्कचा वापर केलेला दिसत होता, उर्वरित सर्वजण अत्यंत निष्काळजीपणे सेकंड सॅटर्डेचा आनंद लुटताना दिसत होते.
राजहंस गडावरील हा प्रकार अद्यापही बेळगाव शहर परिसरातील लोकांना कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य अद्याप लक्षात आलेले नाही, हेच दर्शवित होता. जीवघेण्या कोरोना संसर्गापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनाकडे साफ दुर्लक्ष करून बसेस, कारगाड्या आणि दुचाकीने नागरिक मोठ्या संख्येने राजहंस गडाकडे जाताना शनिवारी दिसून आले.
शहरातील एक व्यावसायिक विक्रम राऊळ हे शनिवारी आपल्या कुटुंबासमवेत राजहंस गडावर सहलीस गेले होते. सध्या भारतासह जगभरात कोरोनाने हाहाकार उडविला असताना राजहंस गडावरी बहुसंख्य पर्यटकांचे बेफिकिर वागणे पाहून राऊळ यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणाले की, कोरोनामुळे फक्त जगात किंवा भारतात नव्हे तर आता बेळगाव मध्ये देखील लोकांचे मृत्यू होत आहेत. परंतु याची गडावर फिरण्यास येणाऱ्यांना काहीच फिकीर नसल्याचे दिसून येत होते. आम्ही जेंव्हा गडावर पोचलो, तेंव्हा तेथे झालेल्या पर्यटकांच्या गर्दीतील कांही मोजक्यांच्याच तोंडावर मास्क दिसत होते. उर्वरित सर्वजण आपल्याच मस्तीत एकमेकांचे सेल्फी काढ फोटो काढ करताना दिसत होते.
शुभांगिनी लोहार या गृहिणी देखील राजहंस गडावर आपल्या कुटुंबासमवेत पर्यटनासाठी गेल्या होत्या. गडावरील पर्यटकांचा हलगर्जीपणा पाहून त्या आपल्या कुटुंबासहित तात्काळ पुन्हा घरी परतल्या. राऊळ आणि शुभांगिनी हे दोघेही त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे कोणताही धोका पत्करायचा नाही असे ठरवून ते आपल्या कुटुंबासह राजहंस गडाच्या आवारातून बाहेर पडले.
राजहंस गडावर किमान सुट्टीच्या दिवशी पोलिस तैनात केले जावेत जेणेकरून पर्यटकांकडून असा हलगर्जीपणा होणार नाही, असे मत शुभांगिनी यांनी व्यक्त केले. राजहंस गडावर मास्क न घालणारी आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारी मंडळी स्वतःचाच नाही तर इतरांच जीव देखील धोक्यात घालत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असता राजगडावर करण्यासंदर्भातील नियमांचे पालन न करता गर्दी होत असल्याची माहिती मिळताच दोघा पोलिसांनी तात्काळ गडावर जाऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणल्याचे सांगण्यात आले. खाकी वर्दीतील हातात लाठी घेतलेले पोलीस दिसताच पर्यटकांनी तात्काळ आपापले मास्क घातले आणि गर्दीतून वाट काढत आपापल्या वाहनांकडे धाव घेतल्याचे समजते.