एका दुकानदाराचा (कमिशन एजंट) कोरोनामुळे मृत्यू झाल्याने बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) होलसेल भाजी मार्केट निर्जंतुकीकरणासाठी सलग दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी शहरातील अन्य भाजी मार्केटसह बाजारात भाजीपाला महागला आहे.
बेळगांव एपीएमसी होलसेल भाजी मार्केट बुधवारी पूर्णपणे सील डाऊन करण्यात आले होते. सॅनिटायझेशन अर्थात निर्जंतुकीकरणासाठी सदर मार्केट बंद करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. तथापि हे मुख्य होलसेल भाजी मार्केट बंद असल्यामुळे शहर परिसरातील इतर सर्व भाजी मार्केटसह बाजारात बुधवारी भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला होता.
परिणामी या तुटवड्यामुळे बाजारामध्ये भाजीपाल्याचा दर एका दिवसात एकदम वाढला आहे. दरम्यान, अशोक सुळगेकर या भाजी उत्पादक शेतकऱ्यासह अन्य शेतकऱ्यांनी एपीएमसी होलसेल भाजी मार्केट बंद करून सॅनिटायझेशन करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
प्रशासनाची ही कृती सर्वांच्याच हिताचे असल्याचे सांगून येळ्ळूर येथील एका तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाला. हा तरुण वरचेवर होलसेल भाजी मार्केटमध्ये येत असल्यामुळे त्याला मार्केटमध्येच कोरोनाचा संसर्ग झाला असावा असे सुळगेकर यांनी सांगितले.
दुर्दैवाची गोष्ट ही की, त्या तरुणाच्या कुटुंबाला कोरंटाईन करण्यात आल्यानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू कोरोनामुळे आला असल्याचे तपासणीत उघड झाले. तेंव्हा आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जिवापेक्षा इतर कोणतीही गोष्ट मोठी नाही हे लक्षात घेऊन सद्यपरिस्थितीत कोरोनापासून आपले संरक्षण करण्यासाठी खबरदारी ही घेतलीच पाहिजे, असेही अशोक सुळगेकर यांनी शेवटी स्पष्ट केले.