बेळगाव जिल्ह्यात आज रविवारी नव्याने 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 470 झाली आहे. त्याचप्रमाणे आज बेळगाव शहरातील दोघांसह जिल्ह्यात आणखी 3 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 12 झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2,627 नवे रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 38,843 झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात आज रविवारी आणखी तिघा जणांचा मृत्यू झाला असून यापैकी दोघेजण बेळगाव शहरातील असून 1 जण अथणी तालुक्यातील आहे. शिवबसवनगर बेळगाव येथील पी -37222 क्रमांकाच्या 80 वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारासाठी हॉस्पिटलला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्याचप्रमाणे विजयनगर, हिंडलगा येथील पी -37223 क्रमांकाच्या 57 वर्षीय पुरुषाला गेल्या 10 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तथापि उपचाराचा फायदा न होता आज त्याचा मृत्यू झाला. या दोघांव्यतिरिक्त अथणी तालुक्यातील पी -25558 क्रमांकाच्या 62 वर्षे पुरुषाला गेल्या 5 जुलै रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचादेखील आज उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला.
मृत्यू पावलेले हे तिघेही जण सारी रुग्ण होते. या तिघांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 12 वर पोहोचली आहे. नव्याने आढळून आलेल्या दोन रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 470 झाली असून 346 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 9 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 11 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज रविवार दि. 12 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 2 627 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38,843 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 22,746 असून यापैकी 532 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
राज्यभरात शुक्रवारी 693 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 15,409 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 71 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 684 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.