बेळगाव सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कामकाजासाठी वकीलासोबत आलेला एक एजंट कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज सोमवारी सदर कार्यालय बंद ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव सब रजिस्ट्रार ऑफिस अर्थात उपनोंदणी कार्यालयामध्ये गेल्या शुक्रवारी जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करणारा एक एजंट आपल्या वकीलसोबत आला होता.
मात्र आता संबंधित एजंट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत आढळून आल्यामुळे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण शुक्रवारी हा एजंट जेव्हा कार्यालयात आला तेव्हा कामानिमित्त त्याने कार्यालयातील अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या.
कोरोना तपासणीत संबंधित एजंट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांवर आता कोरोनाची टांगती तलवार आली आहे. सब रजिस्ट्रार कार्यालयातील सर्व विभागात या कोरोनाबाधित एजंटचा वावर झाला असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज सोमवारी सदर कार्यालय बंद ठेवण्यात आले. परिणामी येथील सर्व विभागातील दैनंदिन कामकाज ठप्प होऊन कार्यालयात शुकशुकाट पसरलेला दिसत होता.
दरम्यान, सब रजिस्ट्रार कार्यालय बंद झाल्यास आपले आर्थिक व्यवहार बंद होणार या चिंतेने कांही एजंट लोक निर्जंतुकीकरण करून सदर कार्यालय पुनश्च सुरू करण्यास धडपडत असल्याचे समजते. तथापि एकंदर परिस्थिती पाहता संबंधित कोरोनाबाधित एजंट कार्यालयातील कर्मचारीवर्गांच्या संपर्कात आलेला असेल तर त्या कर्मचाऱ्यांना 14 दिवस होम काॅरंटाईन व्हावे लागणार आहे. तसे झाल्यास बेळगाव सब रजिस्ट्रार कार्यालयातील व्यवहार आणखी कांही दिवस ठप्प राहणार हे मात्र निश्चित आहे.