कोरोना प्रादुर्भावाच्या काळात बहुचर्चित दहावी अर्थात एसएसएलसी परीक्षा आयोजनाचा धाडसी निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री सुरेश कुमार यांच्यासह विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ने-आण करण्याचे परिश्रम घेऊन परीक्षा यशस्वी करण्यास सहकार्य करणारे भाजप कार्यकर्ते आणि समस्त शहरवासीयांना बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी धन्यवाद दिले आहेत.
यंदाच्या बहुचर्चित दहावीच्या परीक्षेची तृतीय भाषा विषयाच्या शेवटच्या पेपरने आज शुक्रवारी सांगता झाली. कोरोना प्रादुर्भावाचा काळात या परीक्षेचे आयोजन करण्यात आल्यामुळे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आपल्या मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या कार्यकर्त्यांद्वारे त्यांची वाहतुकीची व्यवस्था केली होती. आज दहावीची परीक्षा समाप्त झाल्याप्रीत्यर्थ आमदार बेनके यांनी दहावीची परीक्षा दिलेल्या संबंधित गरीब व गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनीं तसेच स्वतःच्या वाहनाने विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रापर्यंत ने-आण करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी “बेळगाव लाइव्ह”शी बोलताना बोलताना आमदार बेनके यांनी वरील प्रमाणे धन्यवाद व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की राज्यात विशेष करून बेळगाव उत्तर मतदारसंघात कोणताही अडथळा न येता दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पार पडली आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात या परीक्षेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजे. त्याच प्रमाणे माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भाजप कार्यकर्त्यांनी परीक्षा काळात गरीब व गरजू परीक्षार्थींची स्वतःच्या वाहनाने परीक्षा केंद्रापर्यंत ने-आण करण्याचे जे कार्य केले त्यात अत्यंत प्रशंसनीय आहे. याला पालक वर्गासह जनतेने सोशल डिस्टंसिंग, मास्क व सॅनिटायझर यांच्या वापराद्वारे उत्तम सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असे सांगून आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना ते निश्चितपणे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी आमदार अनिल बेनके यांच्या कार्याचा गौरव केला. परीक्षार्थी गरीब गरजू विद्यार्थ्यांना घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत आणि पुन्हा घरापर्यंत आणून सोडण्याची जबाबदारी आमच्यावर सोपविल्याबद्दल आम्हीच त्यांचे आभारी आहोत असे सांगून यापुढे प्रत्येक संकटसमयी आम्ही कायम आमदार बेनके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यानी -विद्यार्थिनींची तसेच जनतेची निस्वार्थ वृत्तीने मनापासून काळजी घेणारे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासारखे लोकप्रतिनिधी फार दुर्मिळ असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी परीक्षा केंद्रापर्यंत वाहतुकीची व्यवस्था करून दिल्याबद्दल दहावीच्या विद्यार्थी -विद्यार्थिनी आमदार बेनके यांचे आभार मानले.