कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर होणार की नाही असे वाटत असणारी दहावीची परीक्षा आज अखेर सुरळीत व बहुतांशी सुरक्षित पार पडली. यामुळे परीक्षा मंडळ आणि शैक्षणिक संस्थांसह परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी हुश्य…! असे म्हणत सुटकेचा निश्वास सोडला आहे.
राज्यभरात सुमारे 8.50 लाख विद्यार्थी – विद्यार्थिनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेला बसले होते. बेळगाव जिल्ह्यात तृतीय भाषेच्या पेपरने या परीक्षेचे आज शुक्रवारी यशस्वी सांगता झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या परीक्षेच्या आयोजनाबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. तथापि राज्य शासन आणि शिक्षण खात्याच्या आदेशानुसार कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करून शहरातील सर्व परीक्षा केंद्रांमध्ये या परीक्षेचे यशस्वी व सुरक्षित आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या धास्तीमुळे कांहीशा तणावपूर्ण वातावरणात झालेल्या या परीक्षेचा आज शेवटचा पेपर दिल्यानंतर परीक्षा केंद्रातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर हुश्य…! सुटलो एकदाचे असे भाव पहावयास मिळत होते.
कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा होणार की नाही? की रद्द होणार? या गोंधळात अडकलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. त्यामुळे आज परीक्षेतून मुक्त झाल्यानंतर आता विद्यार्थी वर्गाला दहावीच्या निकालाची हुरहुर लागुन राहीली आहे. कोरोनामुळे कांही पालकांना व विद्यार्थ्यांना परीक्षाच रद्द केली जाऊन सर्वांना उत्तीर्ण केले जावे असे वाटत होते.
कांही हुशार विद्यार्थ्यांना परीक्षाच रद्द झाल्यास आपली परीक्षेतील टक्केवारी वाया जाणार याची चिंता लागून राहिली होती. मात्र आज अखेर परीक्षा सुरळीत पार पडल्यामुळे सर्वांवरील ताण कमी झाला आहे. दहावीची परीक्षा सुरळीत पार पडल्यामुळे विद्यार्थी -विद्यार्थिनीं प्रमाणे परीक्षा मंडळासह सर्व शैक्षणिक संस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.