सराफ गल्ली शहापुर हीं जुनी परंपरा असणारी गल्ली आहे. शनिवारचा बाजार बरेच वर्षांपासून सराफ गल्लीत भरतो.बेळगाव शहराची ओळख सांगणारे अनेक वाडे या गल्लीत आहेत.स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही वाड्यांचा उपयोग होऊ शकतो.
प्रत्येक गल्लीची एक ठराविक ओळख असते. सराफ गल्लीतील हेरेकरांच्या सराफी दुकाना समोर एक हिरवा डेरेदार आपट्याचा वृक्ष गल्लीच्या सौन्दर्यात भर घालत होता.दसऱ्याला आपट्याच्या पानांची सोनं म्हणून देवाण घेवाण होते. मानवी मनाने मानलेलं हे जीवंत सोनं सराफ गल्लीत दिमाखानं उभं होतं.
आज विकास कामाच्या नावाखाली या वृक्षांची मूळेच उखडून काढण्यात आली आहेत.रस्त्यात आडवा पडलेला हा वृक्षाचा देह माणसाला विचारत आहे की ‘माझी काय चूक होती? झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा सरकार लाखोंच्या जाहिराती देऊन करत आहे, आणि हे असे बहरलेले वृक्ष धाराशाही केले जात आहेत. हा विरोधाभास मनावर ओरखडा उमटवून जातो.आज एक वृक्ष बळी गेला हे खचितच माणसासाठी चांगली गोष्ट नाही.
एकीकडे सरकार बेळगावचं फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या वॅक्सिन डेपो मध्ये बेसुमार वृक्षांची कत्तल करत आहे, तर दुसरीकडे शहरातील गल्लोगल्लीतील झाडांचे देखील बळी घेत आहे.हाच विकास आहे का?झाडाशिवाय शहर स्मार्ट दिसु शकत नाही.