शहरापाठोपाठ कोरोनाने आता ग्रामीण भागातही आपले पाय रोवण्यास सुरुवात केली असून दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. खानापूर तालुक्यात बुधवारी आणखी सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रूग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे.
मंगळवारी मिळालेल्या माहितीनुसार खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकूण पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. बस आगारात मेकॅनिक म्हणून काम करणारा नंदगड येथील 50 वर्षीय रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे आगारातील काही भाग सील करण्यात आला असून नंदगड येथील मुख्य रस्ताही ग्रामपंचायतीने सील केला आहे. यासोबतच तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मंगळवारीच दवाखाना सील करण्यात आला आहे.
शहरापाठोपाठ आता तालुक्यातील नंदगड गावातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.