कधी कधी लहान मुलं मोठ्यांना खूप मोठी शिकवण देऊन जातात. बेळगावच्या अगस्त्य उर्जित स्वामी या अवघ्या ७ वर्षाच्या चिमुरड्याने आपला उदात्त दृष्टिकोन समाजासमोर आणून अनेकांसाठी आदर्श घालून दिला आहे.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने या चिमुरड्याला स्पायडर ज्युनिअरच्या नावाने संबोधित केले जात आहे. त्याचप्रमाणे त्याला लिटल कोरोना वॉरियरच्या नावानेही ओळखले जात आहे. केएलइ इंटरनॅशनल शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या या मुलाने आपल्या पिगी बँकेतून साठवलेल्या पैशातून मागील वर्षी आझम नगरच्या शाळेतील विद्यार्थ्याला सायकल देऊ केली होती. त्याचप्रमाणे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तके, कपडे आणि खाद्यपदार्थांचे वितरण केले आहे.
यावर्षी कोरोनाबाधित रुग्णांसाठी या मुलाने मदतीचा हात पुढे केला असून ५००० हजार रुपयांच्या निधीतून त्याने बीम्स रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप केले आहे. त्याच्या या उदात्त दृष्टिकोनासाठी त्याला त्याच्या वडिलांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे तो सांगतो. त्याने केलेल्या या उपक्रमाबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कल तर्फे त्याचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
हे साहित्य त्याने बीम्स चे संचालक विनय दास्तीकोप यांच्याकडे सुपूर्द केले आहे. यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांच्यासह डॉ. गिरीश दांडगी, डॉ. सुश्रुत कामोजी, अगस्त्यचे वडील उर्जित स्वामी, साजिद शेख, वाहिद शेख हे उपस्थित होते.