सरकारतर्फे करण्यात आलेली १५ टक्के घरपट्टी वाढ कमी करता येत नाही. मात्र बेळगाव मनपाने लावलेले वाढीव कर घरपट्टीतून कमी केले जातील. तसेच यावर्षी जमत नसल्यास कर पुढील वर्षी भरा; दंड लागणार नाही, असे बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी जाहीर केले आहे.
पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे माजी नगरसेवक संघटनेने मागील तीन महिन्यांपासून महापालिकेच्या अन्याय घरपट्टी वाढी विरुद्ध चालवलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. आता एक वर्षाकरिता वाढीव घरपट्टीतून नागरिकांची सुटका झाली आहे.
घरपट्टी वाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज सोमवारी सकाळी सर्किट हाऊस येथे विशेष बैठक झाली. सदर बैठकीस जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, केंद्रीय रेल्वेमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी, जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ, महानगरपालिकेचे आयुक्त जगदीश के एच व इतर अधिकारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे माजी नगरसेवक संघटनेचे प्रतिनिधित्व करताना माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी नगरसेवक दीपक वाघेला आणि संजीव प्रभू हे बैठकीला हजर होते. सदर बैठकीत चर्चेअंती घरपट्टी वाढीच्या बाबतीत उपरोक्त निर्णय देताना मनपाने लावलेले सर्व वाढीव सेस या वर्षी लागू नसतील. पुढच्या वर्षी यासंदर्भात पुढील निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे बेळगावकरांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. अन्यायी घरपट्टी वाढ कमी केल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार असल्याचे सांगून यासंदर्भात आपण उद्या मंगळवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.