बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांकडून कागदपत्रे मागविली असून लवकरच या व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या मागणीची पालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली असून संबंधित व्यावसायिकाकडून आवश्यक कागदपत्रे मागविली आहेत. त्यामुळे लवकरच मूर्तिकार, साऊंड सिस्टिमवाले, मंडप डेकोरेटर्स आदी व्यावसायिकांसह संबंधित कामगारवर्गाला आर्थिक मदत मिळणार आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश गणेशोत्सव मंडळानी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सवावर अवलंबून असणारे विशेषतः मूर्तीकार, मंडप सजावट, साऊंड सिस्टीम व त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार, लहान व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे.
तेंव्हा या सर्वांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महामंडळाने केली होती. त्याला अनुसरून आधार कार्ड, बँक खाते नंबर इत्यादी कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरु झाले असून लवकरच महामंडळाच्या प्रयत्नांना यश येणार आहे.