गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने खानापुर तालुक्याला झोडपून काढल्यामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून नदीच्या दुतर्फा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. असोगानजिकच्या मलप्रभा नदीच्या बंधाऱ्यात लाकूड झाडेझुडपे अडकल्याने दुतर्फा असलेल्या शेतीवाडीचे नुकसान झाले आहे.
गेल्या मंगळवार दुपारपासून मुसळधार पावसाने खानापूर तालुक्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. संततधार पावसामुळे मलप्रभा नदीवर असोगा पूल वजा बंधारा जवळील पाण्याच्या पातळीत बरीच वाढ झाली आहे बंधाऱ्यामध्ये लाकडे व झाडेझुडपे अडकल्यामुळे नदीपात्रातील पाणी आसपासच्या शेतजमिनीत शिरले आहे. नदीपात्रात बाहेर वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे असोगा- भोसगाळी दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मलप्रभेच्या बंधाऱ्यातील पाणी असोग्याच्या शेतातवाडीत घुसून मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
सध्या जांबोटी, कणकुंबी, नेरसा, गवाळी, हेम्माडगा आदी तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा विशेष जोर आहे. खानापूरच्या मलप्रभा नदीघाटाजवळ पाण्याची पातळी जवळपास 8 ते 10 फुटाने वाढली आहे. सततच्या पावसामुळे खानापूरच्या नवीन पूलवजा बंधाराजवळ असलेल्या कुप्पटगिरी रस्त्यावरील नाल्याच्या पुलावर पाणी आल्याने हा रस्ता काही काळ बंद होता. गेल्यावर्षी असोगा नजीकच्या बंधाऱ्यात झाडे -झुडपे व लाकडे अडकून दोन्ही बाजूच्या शेतवाडीचे मोठे नुकसान झाले होते.
तेंव्हा लघु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी यंदा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंधाऱ्यात अडकलेली लाकडे व झाडेझुडपे तात्काळ हटवावीत, जेणेकरून नदीपात्रातील पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल. दरवर्षी या ठिकाणी पूर पूर परिस्थिती मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाय योजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
खानापूर तालुक्यात गेल्या पांच दिवसापासून पावसाला सुरुवात झाली असली तरी मंगळवारी दुपारपासून मुसळधार पाऊस पडू लागला आहे. काल बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे 220 मि. मी. इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर सर्वात कमी पाऊस बिडी येथे 50.02 मि. मी. इतका नोंदविला गेला आहे.