काॅरंटाईन नियमांचे उल्लंघन करून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 573 जणांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आला आहे. काॅरंटाईन प्रक्रियेचे जिल्हा समन्वय अधिकारी बेळगाव महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्या निर्णयावरून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
लॉक डाऊन शिथील झाल्यानंतर 9 मेपासून परराज्यात अडकलेले अनेक नागरिक बेळगाव जिल्ह्यात येण्यास सुरुवात झाली. त्यांच्यासाठी प्रशासनाने काॅरंटाईन सक्तीचे केले होते. जीओ तंत्रज्ञानाचा आधार घेऊन कोरंटाईन प्रक्रिया केले जाते. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका मोबाईल एप्लीकेशनमध्ये काॅरंटाईन व्यक्तींची नोंद दररोज करावी लागते. त्यामुळे काॅरंटाईन व्यक्ती नेमकी कुठे आहे? हे कळते. मात्र कांही जणांनी या काॅरंटाईन नोंदणी प्रक्रियेचे पालन न करता जिल्ह्यात प्रवेश केला आहे. प्रशासनाने अशा सर्व लोकांचा शोध घेतला असून आता त्यांच्या विरोधात थेट कारवाई होणार आहे.
काॅरंटाईन नियमांचे उल्लंघन केलेल्या जिल्ह्यातील प्रत्येकाची माहिती घेण्यात आली असून तालुकानिहाय यादी तयार करून ती तहसीलदार व प्रांताधिकार्यांकडे पाठविण्यात आली आहे. संबंधित लोकांचा शोध घेऊन आधी त्यांना इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन करावे, त्यानंतर त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश जगदीश के. एच. यांनी दिला आहे. त्याप्रमाणे संबंधित सर्व लोकांची नांवे प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहीर करावीत आणि दररोज किमान 20 लोकांचा शोध घेतलाच पाहिजे, असेही जगदीश यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. एकंदर आता काॅरंटाईन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागणार हे निश्चित झाले आहे. काॅरंटाईन नियमांचे उल्लंघन केलेल्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव शहर -76, बेळगाव तालुका -103, हुक्केरी -55, खानापूर -54, बैलहोंगल -28, सौंदत्ती -15, रामदुर्ग -11, गोकाक -45, मुडलगी -13, अथणी -37, कागवाड -16, चिकोडी -30, निपाणी -48, रायबाग -24 आणि कित्तूर -18.