निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे बेळगाव तालुक्यातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या बटाटा पिकाचे यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची शासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांनी दिला आहे.
बेळगाव तालुक्यातील बटाटा उत्पादक सध्या मोठ्या या पेचात सापडले आहेत. कारण त्यांनी पेरलेल्या बियाणांना अद्याप कोंबच फुटलेले नाहीत. खरीप हंगामात तालुक्यातील लाल व काळा मातीच्या सुमारे 2,500 हेक्टर जमिनीत शेतकरी बटाट्याचे उत्पादन घेत असतात. गेल्या काही वर्षापासून वातावरणातील बदल आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे बटाटा उत्पादनाचे हे क्षेत्र घटत चालले आहे. तथापि काही शेतकरी प्रामुख्याने बटाट्याचेच पीक घेत असले तरी यंदा दुय्यम दर्जाच्या बियाण पेरणीमुळे त्यांच्यावर नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. बेळगाव एपीएमसीमधील बटाटा व्यापारातील दलाल शेतकऱ्यांना दर वर्षी उसनवार बटाटा बियाणे पुरवत असतात. हे दलाल जालंधर पंजाब येथून सदर बियाणे मागवतात. यंदा शेतकऱ्यांनी या दलालांकडून प्रतिक्विंटल 2,400 रुपये दराने बियाणे खरेदी केली आहेत. यासंदर्भात बोलताना शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांनी सांगितले की शेकडो शेतकऱ्यांनी कर्ज काढून बटाटा बियाणे खरेदी केली आहेत.
तथापि या बियाणांपैकी बहुतांश बियाणे निकृष्ट दर्जाचे आहेत. बटाटा उत्पादक शेतकरी बटाटा उत्पादनासाठी एकरी 50 हजार रुपये खर्च करत असतो. मात्र निकृष्ट बियाणांमुळे यंदा या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, हे नुकसान इतके अपरिमीत आहे की शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर संबंधित शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. तेंव्हा राज्य शासनाने त्वरित संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी नेते अप्पासाहेब देसाई यांनी दिला आहे.
दरम्यान, फलोत्पादन खात्याचे उपसंचालक रवींद्र हाकाटी याने शेतकरी खासगी कंपन्यांकडून बियाणे खरेदी करतात त्यांचे बिल ही घेत नाही त्यामुळे आवश्यक कारवाई करणे अवघड जात असल्याचे सांगितले. तथापि आम्ही तक्रारीची दखल घेऊन सर्वेक्षण हाती घेतले आहे, असेही हाकाटी यांनी स्पष्ट केले.