गोगटे सर्कल येथे स्टेट बँक ऑफ इंडियापासून रेल्वे ओव्हरब्रिजला जोडणारा “फ्लाय ओव्हर ब्रिज” तयार करण्याचा प्रस्ताव एम. एल. भरतेश पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मांडला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. -4 अ (एनएच -4 ए) म्हणजे बेळगाव – पणजी महामार्ग हा शहराच्या मध्यवर्ती भागातून जातो. सध्या शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अलीकडच्या काळात या भागात वाहतुकीची प्रचंड गर्दी आणि माणसांची वर्दळ वाढली आहे. बेळगावहून गोव्याला पाठवणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुद्धा याच मार्गावरून होते. येथील वाहतूक कोंडी आणि वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी पर्याय निवडणे आवश्यक आहे. यादृष्टीने भरतेशच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी याबाबत अभ्यास करून गोगटे सर्कल येथे स्टेट बँक ऑफ इंडियापासून रेल्वे ओव्हर ब्रिजपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज बांधण्याचा पर्याय सुचवला आहे.
सदर विद्यार्थ्यांनी आपला प्रस्ताव केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी आणि आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह महानगरपालिकेकडे गेल्या 1 जून रोजी सादर केला आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत सर्वेक्षण केले असून त्यामध्ये त्यांना ग्लोब टॉकीजपासून बसवेश्वर सर्कलपर्यंत दररोज 60 टक्के वाहतूक होते. तसेच ग्लोब टॉकीजपासून काँग्रेस रोडमार्गे 30 टक्के आणि ग्लोब टॉकीजपासून रेल्वे स्टेशनपर्यंत 10 टक्के वाहतूक होत असल्याचे आढळून आले आहे. याखेरीज या विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलीस, बस चालक, ऑटोरिक्षा चालक, दुचाकी आणि चारचाकी चालक आदींशी संवाद साधून सर्वांचे मत जाणून घेऊन त्यानंतर हा प्रस्ताव मांडला आहे.
एम. एल. भरतेश पॉलिटेक्निक कॉलेजच्या अभिषेक मालाजी, अतुल बेळगुंदकर, जुनैद सावनूर, नागास्वामी हट्टी व शुभम मालाजी या विद्यार्थ्यांनी प्रा. राजू मनोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तयार केला आहे.