गोवावेस येथील खानापूर रोड मार्गावरील डायग्नोस्टिक सेंटर समोरील गतिरोधकाच्या ठिकाणी असणारे धोकादायक खड्डे आम्ही बेळगावकर सेवेकर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारी श्रमदानाने बुजविले.
गोवावेस येथील खानापूर रोड मार्गावरील डायग्नोस्टिक सेंटर समोरील गतिरोधकाच्या ठिकाणी गेल्या कांही महिन्यांपासून रस्त्यावर पडलेले खड्डे होते. या रस्त्यावर नेहमी लहान मोठ्या आणि अवजड वाहनांची रहदारी असते. सततच्या रहदारीमुळे गतिरोधक का नजीकचे संबंधित खड्डे अलीकडे मोठे होऊन वाहनचालकांसाठी विशेषता दुचाकी वाहन चालकांसाठी धोकादायक ठरले होते. त्याचप्रमाणे या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांचे नुकसानही होत होते. पावसाळ्यात सदर खड्डे पाण्याने भरल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
याची दखल घेऊन आम्ही बेळगांवकर सेवेकर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारी सकाळी श्रमदानाने दगडमातीच्या भरावाने सदर खड्डे बुजवून तात्पुरती डागडुजी केली. या श्रमदानामध्ये परशराम हुबरवाडी, राहूल जांगले, बाळकुष्ण लाड, संभाजी भेकणे व युवराज भांदुर्गे या युवकांचा सहभाग होता.
संबंधित धोकादायक खड्डे बुजवले यामुळे या रस्त्यावरून नेहमी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये विशेष करून दुचाकी वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तथापि संबंधित खात्याने या खड्ड्यांकडे लक्ष देऊन ते व्यवस्थितरित्या कायमस्वरूपी बुजवून टाकावेत अशी मागणी होत आहे.