औषध दुकानातून आणलेल्या पित्तावरील औषधाचा जादा डोस घेतल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना हालगा (ता. बेळगाव) येथे गुरुवारी रात्री घडली.
मयत महिलेचे नांव यल्लूबाई कल्लाप्पा हुरडे (वय 55 रा. हलगा) असे आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की यल्लुबाई हुरडे यांना पूर्वीपासून पित्ताचा त्रास होता. प्रारंभी उपचारासाठी डॉक्टरांकडे जाणाऱ्या यल्लुबाई कालांतराने औषधे माहीत असल्यामुळे स्वतःच दुकानात जाऊन संबंधित औषध आणत होत्या.
आपल्या पद्धतीने काल गुरुवारी सकाळी आणि दुपारी औषध दुकानातून आणलेले पित्तावरील औषध घेऊन त्या झोपी गेल्या होत्या. दोन्ही वेळा औषध घेताना त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण देखील नव्हता असे समजते. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास यल्लूबाई यांचा मुलगा त्यांना उठवण्यासाठी गेला असता आपली आई मृत पावल्याचे त्याच्या लक्षात आले.
मयत यल्लुबाई हुरडे त्यांच्या पश्चात पती, दोन कर्ते चिरंजीव, एक विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. उपरोक्त घटनेची हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.