कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांनी ऑनलाईन शैक्षणिक वर्ग घेण्यास सुरुवात केली असली तरी लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅबलेट अभावी बऱ्याच मुलांना या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. गरिबी रेषेखालील पालकांसाठी आपल्या मुलांना स्मार्टफोन खरेदी करून देणे ही अवघड बाब आहे. परिणामी बरेच गरीब पालक स्वस्तात सेकंड हँड फोन मिळवण्यासाठी दुकाने धुंडाळत आहेत. त्याचप्रमाणे कांहीजण 2,700 ते 5000 इतक्या कमी किंमतीतील मोबाईल खरेदी करण्याचा प्रयत्न करताहेत. स्मार्ट फोनच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने दुकानदारांनाही आवश्यक स्टॉक नसल्यामुळे ग्राहकांचे समाधान करणे अवघड जात आहे.
यासंदर्भात बोलताना मोबाईल फोन डीलर सचिन पाटील म्हणाले की, पूर्वी आमच्याकडे सेकंड हॅन्ड मोबाईल फोनचा स्टॉक असायचा मात्र तेंव्हा त्याला मागणी नव्हती. आता अशा सेकंड हॅन्ड फोनची मागणी वाढली असली तरी आमच्याकडे स्टॉक उपलब्ध नाही. लाॅक डाऊन आणि राज्याच्या सीमा बंदीमुळे मोबाईल फोनच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या बाजारात स्वस्तातील स्मार्टफोन मिळणे अवघड झाले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
लॉक डाऊनची अचानक अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे बऱ्याच पालकांना मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या दृष्टीने तयारी करायला वेळ मिळाला नाही, असे दोन शाळकरी मुलांच्या पालक असणाऱ्या सुधा गणेशगुडी यांनी सांगितले.
मुलांना शाळेत शिक्षकांकडून समोरासमोर ज्या पद्धतीने दर्जेदार शिक्षण मिळते त्याची सर या ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाला येत नसल्याची वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली. अश्विनी बिर्जे या अन्य एका पालकाने आपले मत व्यक्त करताना कांही पालकांसाठी मुलांसाठी स्मार्ट फोन अथवा लॅपटॉप खरेदी करून देणे फारसे अवघड नाही. परंतु मुले मिळालेल्या या सुविधेचा गैरवापर तर करणार नाहीत ना? ही खरी समस्या असल्याचे सांगितले.