कोरोना विषाणूने नव्हे तर जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे माझ्या वडिलांचा बळी गेला आहे, असा आरोप मोहन (नांव बदललेले) याने केला आहे. अलीकडेच मोहनचे वडील कोरोनामुळे मृत्यू पावले असून सध्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांना समाजाकडून सापत्नभावाची वागणूक मिळत आहे.
बेळगाव तालुक्यातील सूळगा गावचा रहिवासी असणाऱ्या मोहनचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यासह संपूर्ण कुटुंबाला होम काॅरंटाईन करण्यात आले होते. कांही दिवसांपूर्वी त्याच्या आजीचे निधन झाले, त्यानंतर आता वडिलांचा मृत्यू झाला. मोहनचे काका देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. परंतु हे न सांगता दुसरीच कथा सांगताना मोहनने आपल्या वडिलांच्या मृत्यूस जिल्हा प्रशासनला दोषी ठरविले आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना मोहनने दिलेली माहिती अशी की, त्याच्या आजीला सोरायसिस विकार असल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड औषधे घ्यावी लागत होती. अलीकडे तिच्या एका पायाला सूज येऊ लागल्यामुळे डॉक्टरांनी स्टेरॉईड औषधे बंद करण्याचा सल्ला दिला. परिणामी त्याच्या आजीला श्वसनाचा त्रास सुरू होऊन त्यातच तिचे निधन झाले. दरम्यान सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे लोकांनी मोहनच्या आजीला कोरोना झाला असावा असा समज करून घेतला. ही परिस्थिती असताना मोहनच्या वडिलांना देखील श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला. हा त्रास त्यांना दरवर्षी मान्सूनच्या काळात होत होता. त्यांची श्वसन व्यवस्था क्षीण असल्यामुळे पावसाळ्यात त्यांना नेहमी हा त्रास व्हायचा.
यावेळीही तसा त्रास सुरू झाल्याने मोहनच्या वडिलांना जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तेंव्हा इतर कोरोना संशयित रुग्णांच्या बरोबरीने त्यांना देखील कोव्हीड विभागात दाखल करण्यात आले. दीड दिवसांनी त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले. मात्र या कालावधीत मोहनचे श्वसन व्यवस्था क्षीण असलेले वडील कोरोनाग्रस्त झाले होते. त्यावेळी मोहनचे काका त्याच्या वडिलांचे अटेंडर असल्यामुळे त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. आपले वडील आणि काका यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्टरी नाही तसेच त्यांनी कोरोना संदर्भात आवश्यक खबरदारी घेतली होती. परंतु जिल्हा प्रशासन आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या वडिलांचा बळी गेला आणि काका कोरोनाबाधित झाले, असा आरोप मोहनने केला आहे. त्यामुळे कोणतीही चूक नसताना मोहन आणि त्याच्या कुटुंबीयांना सध्या समाजाकडून सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे.
मोहन प्रमाणेच व्यथा असलेल्या सुरेश (नांव बदललेले) याने देखील आपल्या कोरोनाबाधित वडिलांचा मृत्यू जिल्हा प्रशासनच जबाबदार असल्याचे सांगितले आहे. जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड विभाग हा रुग्णांना बरे होण्यास मदत करण्याऐवजी लोकांमध्ये कोरोना पसरवण्यास जास्त मदत करत आहे. कारण ज्या संशयितांना तेथे दाखल केले जात आहे ते सर्व कोरोनाग्रस्त बनत असल्याचा आरोप सुरेशने केला आहे.
यासंदर्भात बीम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी असा हलगर्जीपणा होणे शक्यच नसल्याचे सांगून देशभरात सर्वत्र रुग्णांच्या सुरक्षेच्या बाबतीत काही प्रक्रियांचे काटेकोर पालन केले जाते, असे स्पष्ट केले. रुग्णांसाठी दोन कक्ष असतात त्यापैकी एक कोरोना संशयित रुग्णांसाठी आणि दुसरा कोरोनाबाधित रुग्णांसाठी असतो. याव्यतिरिक्त ट्रीयाज नांवाचा एक कक्ष असतो, जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्णांची विभागणी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावत असतो. स्वॅबचे नमुने घेतल्यानंतर तपासणी अहवाल हाती येण्यासाठी किमान 8 ते 10 तास लागतात. तोपर्यंत संबंधित रुग्णांना सर्वती खबरदारी घेऊन ट्रीयाज कक्षामध्ये ठेवले जाते. तपासणी अहवाल याची खातरजमा झाल्यानंतर रस्त्यांना तेथून अन्यत्र संबंधित विभागात हलविण्यात येते, अशी माहिती डॉ. विनय दास्तीकोप यांनी दिली. तसेच रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनावरील आरोप फेटाळून लावले.