फक्त कोरोनाग्रस्त रुग्णांवर लक्ष केंद्रित करून अन्य गंभीर व्याधीग्रस्तांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वाढली आहे. यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग उद्भवत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.
यासंदर्भातील माहिती अशी की, हलगा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रोडवर आढळून आलेला गोरखपुर उत्तर प्रदेश येथील एका गंभीर जखमी इसम आणि बेळगाव रेल्वे स्टेशन येथे पायाला दुखापत झालेला गंभीर जखमी इसम अशा दोन असहाय्य व्यक्तींना सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी काल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले होते. तेंव्हा आता हे कोविड हॉस्पिटल आहे येथे अन्य उपचार केले जाणार नाहीत, असे सांगून संबंधित जखमींवर उपचार करण्यास नकार देण्यात आला होता. त्यावेळी अनगोळकर यांनी संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिल्यानंतर ते उपचार करण्यास तयार झाले होते. तथापि संबंधित जखमी रुग्णांवर उपचार करण्याऐवजी यांना हॉस्पिटल बाहेर काढण्यात आल्याचे आज सकाळी सुरेंद्र अनगोळकर यांच्या निदर्शनास आले.
माणुसकी हरवलेला हा प्रकार पाहून खवळलेल्या सुरेंद्र अनगोळकर यांनी सिव्हिलच्या डॉक्टरांना जाब विचारला असता सरकारने सिव्हिल हॉस्पिटलला आता कोविड हॉस्पिटल केले आहे. तेंव्हा येथे इतर उपचार केले जाणार नाहीत वाटल्यास आम्ही जखमी व्यक्तींवरील उपचारासाठी इतर हॉस्पिटलमध्ये शिफारस करू शकतो, असे सांगण्यात आले. तसेच त्या दोन जखमी रुग्णांवर उपचार न करताच त्यांची रवानगी जुन्या महापालिका कार्यालयानजीकच्या निवार्यामध्ये करण्यात आली.
दरम्यान, कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथील नागप्पा कल्लाप्पा पाटील यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांच्यावर येळ्ळूर रोड येथील केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काल बुधवारी त्यांना खोकला सुरू झाला. खोकल्या व्यतिरिक्त कोरणा संदर्भातील कोणतीही लक्षणे नागप्पा पाटील यांच्यात दिसत नव्हती तरीदेखील त्यांना हॉस्पिटलमधून बाहेर काढून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. तेंव्हा नागप्पाचे नातलग त्यांना सिव्हिल हॉस्पिटलकडे घेऊन गेले. मात्र त्याठिकाणी सर्व बेड्स रुग्णांनी भरले असल्याचे सांगून नागप्पा यांना तेथे दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविण्यात आली. परिणामी रुग्णाला मुख्य केएलई हॉस्पिटलकडे नेण्यात आले. त्याठिकाणीही नागप्पा यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात येऊन त्यांना येळ्ळूर रोड येथील केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे नागप्पा यांना पुन्हा येळ्ळूर रोड केएलई हॉस्पिटलकडे परंतु पुन्हा या हॉस्पिटलमध्ये नागाप्पा यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला.
या पद्धतीने नागप्पा पाटील या गंभीर आजारी रुग्णाला घेऊन त्याचे नातेवाईक सायंकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12:30 वाजेपर्यंत सिव्हिल हॉस्पिटल आणि केएलई हॉस्पिटलचे उंबरठे झिजवत होते. परंतु दुर्दैवाने या दोन्ही हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांची थोडीही दया आली नाही. अखेर शिफारस वापरून नागप्पा पाटील यांना मध्यरात्री 1 वाजता जुने बेळगाव येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, शहरातील प्रतिष्ठित व जबाबदार समजल्या जाणाऱ्या केएलई हॉस्पिटल आणि सिव्हील हॉस्पिटलकडून घडलेल्या उपरोक्त बेजबाबदार प्रकाराबद्दल नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी केलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर माणुसकीच हरवली असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे वरील प्रकार पाहता जिल्हा प्रशासन सर्व सामान्य नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे.