कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर सर्व वाहने न्यायालय आवाराबाहेर पार्क करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे बेळगाव न्यायालय आवाराबाहेर गुरुवारी वाहनांची गर्दी पहावयास मिळाली.
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने न्यायालय आवारात पार्क केली जाणारी वाहने आवाराबाहेर थांबविली जावीत, असा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी बेळगाव न्यायालयीन आवारात करण्यात येत असल्यामुळे वकील आणि पक्षकारांसह खुद्द न्यायाधीशांची वाहने देखील आज गुरुवारी न्यायालय आवाराबाहेर पार्क करण्यात आल्याचे दिसून आले. यापूर्वी न्यायाधीशांसह सर्वांचीच वाहने न्यायालय आवारात पार्क केली जात होती. परिणामी न्यायालय आवारात वाहनांची गर्दी होण्याबरोबरच वाहतुकीस अडचण निर्माण होत होती.
सध्या राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने यापुढे न्यायालय आवारात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाऊ नये असा आदेश जारी केला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे आता आवाराच्या आत पहावयास मिळणारी वाहनांची गर्दी आता न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर पहावयास मिळत आहे. मात्र यामुळे आता न्यायालय आवारासमोर वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि पूर्वीप्रमाणे वाहनांची गर्दी होत नसल्यामुळे न्यायालय आवार सध्या मोकळा श्वास घेताना दिसून येत आहे.
दरम्यान, न्यायालय आवारात पार्क केली जाणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने आता न्यायालय आवाराबाहेर रस्त्याकडेला पार्क केली जात असल्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे. यापूर्वी न्यायालय आवारात होणाऱ्या रहदारीच्या कोंडीपेक्षा आवाराबाहेर होणारी ही वाहतुकीची कोंडी गंभीर असणार आहे. याखेरीज न्यायालय आवाराबाहेर मोठ्या प्रमाणात वकील, पक्षकार आदींची दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जात आहेत. त्यांचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडत आहे. तेंव्हा न्यायालय अथवा येथील बँक आदी कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्यांसाठी पार्किंगची सोय केली जावी, अशी मागणी समस्त वकीलवर्गातर्फे एका वकिलांनी प्रसारमाध्यमांसमोर केली. बेळगाव न्यायालय आवारात वाहनांसाठी पार्किंगची सोय केली जावी, अशी मागणी आम्ही सर्वजण उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे निवेदनाद्वारे करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.