आजकाल माणूस हा इतरांसाठी काही करण्याआधी हजारवेळा विचार करतो. स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळेसोबतच स्वतःची स्पर्धा करतो. या युगात इतरांच्या मदतीला निःस्वार्थीपणे धावून जाणारे शिवाय इतरांना सल्ला देणारेही तसे कमीच. परंतु काही अवलिया असे असतात कि अगदी मनापासून ते स्वतःला समाजकार्यात झोकून देतात.
बेळगावमध्ये नागपूरहून दाखल झालेल्या अशाच एका अवलियाने “बेळगाव लाईव्ह” शी संपर्क साधला. यावेळी त्यांनी दिलेली माहिती ऐकून या जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे आणि समाजासाठी स्वतःला झोकून देऊन कार्य करण्याची मानसिकता अजूनही जिवंत आहे याची प्रचिती आली. या अवलियाचे नाव आहे विशाल मनोज टेकाडे.
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी “स्टॉप कोरोना नॉट ह्युमॅनिटी” हे ब्रीद घेऊन समाजहितासाठी १३ जूनपासून सायकलवरून भ्रमंती करून भारताच्या चारही दिशांना भेट देऊन मानवतेचा संदेश देण्याचा मानस या युवकाने बोलून दाखविला आहे. नागपूर येथील या युवकाने १३ जूनपासून आपल्या सायकल फेरीला सुरुवात केली आहे. नागपूरहून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, आणि त्यानंतर बेळगावमध्ये दाखल होऊन एका आर्मी कोचिंग सेंटरमध्ये सध्या आश्रयास असलेल्या युवकाने आपल्या प्रवासाबद्दलहि माहिती दिली.
सध्या कोरोनासारखा सांसर्गिक रोग सर्वत्र फोफावत असून या रोगाच्या धर्तीवर अनेक ठिकाणी आलेले कटू अनुभवही विशालने सांगितले. यावेळी हे अनुभव ऐकून मन सुन्न होते. कोरोनामुळे रोगापेक्षा माणसांचीच भीती माणसाला वाटत असून सर्वत्र माणुसकी हरवत चालल्याचे चित्र भासत असल्याचे त्याने सांगितले. नागपूरहून सुरु केलेल्या प्रवासात कोरोनामुळे माणसाच्या मनात निर्माण झालेल्या भीतीमुळे काहीवेळा मंदिरे तर काहीवेळा स्मशानात देखील आसरा घ्यावा लागल्याची माहिती विशालने दिली आहे.
केवळ समाजात मानवतेचा संदेश पोहोचविण्यासाठी सुरु केलेल्या प्रवासात विशालला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अनेकवेळा समाजातील काहींनी आर्थिक सहकार्य केले असून या सहकार्यामुळे पुढील प्रवास शक्य झाल्याचे त्याने सांगितले. सध्या बेळगावच्या क्लब रोडवरील आर्मी कोचिंग सेंटरमध्ये वास्तव्यास असलेल्या विशालला देशभरात सायकलवरून प्रवास करून प्रत्येकाला मानवतेचा संदेश द्यायचा आहे. सध्या निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीत आपल्याला कोरोनाविरोधात लढायचे असून कोरोनाबाधितांशी लढायचे नाही, त्यामुळे प्रत्येकाने माणुसकीचे नाते जपावे असा संदेश या युवकाने दिला आहे.
बेळगावनंतर विशाल टेकाडे हा युवक बंगळुरमार्गे कन्याकुमारीकडे प्रस्थान करणार असून ज्या ज्या ठिकाणी तो जाईल त्या त्या ठिकाणी मानवतेचा संदेश देणार असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या या उपक्रमाबद्दल कुणाला माहिती हवी असल्यास ८८८८०१६६३२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्याने केले आहे.